लज्जास्पद! अवघ्या 23 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट, 6 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही
आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचा दुसरा हंगाम मलेशियातील क्वालालंपूर येथे खेळला जात आहे. या स्पर्धेला 18 जानेवारीपासून सुरुवात झाली. आज स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी एक नकोसा विक्रम घडला.
आज (19 जानेवारी) ग्रुप अ मध्ये श्रीलंका आणि मलेशिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेनं यजमान मलेशियाचा 139 धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. मात्र या सामन्यात मलेशियानं स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम नोंदवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध मलेशियन फलंदाज एकामागून एक बाद होत राहिल्या. त्यांच्यापैकी कोणीही दुहेरी आकडाही गाठू शकल्या नाही.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं मलेशियासमोर विजयासाठी 163 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, यजमान संघ अवघ्या 23 धावांवर ऑलआउट झाला. या विजयासह श्रीलंकेनं पॉइंट्स टेबलमध्ये आपलं खातं उघडलं आहे. संघाचा नेट रन रेट +6.950 झाला आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्याच गटात आहे. टीम इंडियाचा पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
या सामन्यात मलेशियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमकुवत गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध श्रीलंकेनं धमाकेदार सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्येच 2 विकेट गमावून 52 धावा केल्या. श्रीलंकेकडून दहमी सनेथामानं 55 धावा केल्या. तिच्याशिवाय सलामीवीर संजना कविंदीनं 13 चेंडूत 30 धावा केल्या. श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 162 धावा केल्या.
163 या धावसंख्येचा पाठलाग करताना मलेशियन संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पॉवर प्लेमध्ये संघाला 3 विकेट गमावून फक्त 9 धावा करता आल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मलेशियाची एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकली नाही. संघाकडून सलामीवीर फलंदाज नूर आलिया हैरुणनं सर्वाधिक 7 धावा केल्या. श्रीलंकेचा पुढील सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आहे आणि मलेशियाचा पुढचा सामना भारताविरुद्ध आहे. हे दोन्ही सामने 21 जानेवारी रोजी खेळले जातील.
हेही वाचा –
खूप झाला आराम…रोहित, जडेजासह हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणार; कोहली अजूनही विश्रांतीवर
धक्कादायक! भारतीय क्रिकेटमध्ये हे काय चाललंय? उपकर्णधारावरून बैठकीत गोंधळ
करुण नायरची संघात निवड न झाल्याने माजी खेळाडूचा संताप, बीसीसीआयला सुनावले!
Comments are closed.