वैभव सूर्यवंशीला टार्गेट करणार का श्रीलंका ए संघ? अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार काय म्हणाला?
श्रीलंकेत सुरू असलेल्या ‘ट्राय-नेशन ए’ मालिकेचा अंतिम सामना रविवारी (21 जून) रोजी दांबुला येथे भारत ‘ए’ आणि श्रीलंका ‘ए’ यांच्यात होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात सर्वांचे लक्ष 15 वर्षांचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) असेल. याआधी जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा वैभव आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये मैदानात वाद झाले होते. तो सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत गेला होता, ज्यात भारताचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्याआधी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, श्रीलंका ‘ए’ चे खेळाडू पुन्हा एकदा वैभवला लक्ष्य करतील का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीलंकेचा कर्णधार सहान अराचिगे याने दिले आहे.
अंतिम सामन्याआधी सहान अराचिगेने स्पष्ट केले की, आमचे खेळाडू वैभव सूर्यवंशीला लक्ष्य करत नाहीत. त्याच्या मते, मागच्या वेळी जे काही घडले ते केवळ खेळाच्या जोशामुळे झाले. स्पोर्टस्टारशी बोलताना तो म्हणाला, आमचे खेळाडू कोणत्याही एका खेळाडूला टार्गेट करत नाहीत, ते फक्त खेळाचा आनंद घेत आहेत. सुपर ओव्हरसारख्या अटीतटीच्या सामन्यांत भावना तीव्र होतात आणि हे खेळाचाच एक भाग आहे.
तो पुढे म्हणाला, आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना मैदानात कसे वागावे आणि सामना कसा खेळावा, हे चांगले माहित आहे.
खरं तर, मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना टाय झाला होता आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने विजय मिळवला होता. त्या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा खेळाडू विशेन हालंबगे यांच्यात मोठा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला होता की, वैभवने त्या खेळाडूला धक्काही दिला होता. त्यानंतर अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, हालंबगे सामन्यादरम्यान वैभवला सातत्याने चिडवत होता आणि मालिकेच्या सुरुवातीपासूनच दोघांमध्ये वाद सुरू होते.
रिपोर्टनुसार, हालंबगेने वैभवला म्हटले होते की, घरी जा, हे आयपीएल नाहीये. त्यानंतर वैभव त्याच्याशी भिडला आणि मैदानावरील वातावरण तापले होते. सलग दोन सामने हरल्यानंतर, तिलक वर्माच्या (Tilak verma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने अफगाणिस्तान ‘ए’ ला मोठ्या फरकाने हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर वैभव सूर्यवंशीकडे स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. या मालिकेत वैभवच्या बॅटमधून अद्याप अपेक्षेप्रमाणे धावा निघालेल्या नाहीत. त्याने आतापर्यंत 4 सामन्यांत केवळ 117 धावा केल्या आहेत. मात्र, आता त्याच्यासमोर अंतिम सामन्यात मोठी संधी असणार आहे, जिथे तो एका शानदार खेळीने आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करेल.
Comments are closed.