श्रीलंका आणि तामिळनाडू इतिहास व संस्कृतीने जोडलेले; राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनी केले मुख्यमंत्री विजय यांचे अभिनंदन
श्रीलंका आणि तामिळनाडूमध्ये खोलवर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असल्याचे सांगत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी रविवारी तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अभिनेते ते राजकारणी असा प्रवास करणारे ५१ वर्षीय तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यातच X वर पोस्ट करत शुभेच्छा देताना राष्ट्राध्यक्ष दिसानायके म्हणाले की, “श्रीलंका आणि तामिळनाडू हे इतिहास, संस्कृती, उद्योग आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांमधील दृढ संबंधांनी एकमेकांशी जोडलेले आहेत.” श्रीलंका आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असताना, भविष्यकाळ आर्थिक प्रगती आणि संधींनी भरलेला असल्याचेही ते म्हणाले.
हिंदुस्थान-श्रीलंका भागीदारीच्या चौकटीत राहून अधिक समृद्धी आणि प्रगतीसाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. “श्रीलंकेतील जनता तुमच्या आणि तामिळनाडूच्या जनतेच्या यशासाठी शुभेच्छा देत आहे,” असेही ते म्हणाले.
Comments are closed.