ICC T20 World cup श्रीलंकेचा वर्ल्ड कपमध्ये खेळ खल्लास
टॉस जिंकूनही क्षेत्ररक्षण घेऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारी यजमान श्रीलंका न्यूझीलंडविरुद्ध दारुणरीत्या पराभूत झाली. या सलग दुसऱया पराभवामुळे लंकेचा वर्ल्ड कप प्रवास सुपर एटमध्येच संपला असून न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवले आहे.
महीश तीक्षणाने अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक मारा करत न्यूझीलंडची 12.1 षटकांत 6 बाद 84 अशी केविलवाणी अवस्था केली होती. तेव्हा कर्णधार मिचेल सॅण्टनर (47) आणि कोल मॅकाsंची (31) यांनी सातव्या विकेटसाठी 84 धावांची भागी रचत संघाला अनपेक्षितपणे 168 हा जादुई आकडा गाठून दिला. तीक्षणाने 30 धावांत तर दुष्मंथा चमीराने 38 धावांत 3 विकेट घेतले.
मग 169 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला मॅट हेन्रीने पहिल्याच चेंडूवर पथुम निस्सांकाचा त्रिफळा उडवला तर दुसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चरिथ असलांकाची विकेट काढली. त्यानंतर रचिन रवींद्रने आपल्या पहिल्या दोन चेंडूवरच कुसल मेंडिस आणि पवन रत्नायकेची विकेट काढत श्रीलंकेला पराभवाच्या दरीत ढकलले. तसेच मग पुढच्या दोन षटकांत दासुन शनाका आणि दुषण हेमंता यांची विकेट काढत रवींद्रने आपल्या संघाला उपांत्य फेरीच्या दारात उभे केले. पराभव निश्चित झाल्यानंतर श्रीलंकेने केवळ 20 षटके खेळून काढली.
Comments are closed.