Ratnagiri News – संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोर एसटी बस खड्ड्यात रुतली; प्रवाशांचा जीव ४ तास टांगणीला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात चाललेला ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे असलेले अक्षम्य, दुर्लक्ष यामुळे संगमेश्वर परिसरात प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याचाच एक अत्यंत संतापजनक प्रकार संगमेश्वर जवळ पोलीस ठाण्यासमोर रात्रीच्या वेळी घडला. सुरक्षिततेच्या सर्व नियमांना पायदळी तुडवणाऱ्या ठेकेदाराने काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक किंवा धोक्याची सूचना देणारे रिफ्लेक्टर्स लावले नव्हते. ठेकेदाराच्या याच अक्षम्य स्वरूपाच्या चुकीमुळे मुंबईकडे जाणारी एसटी बस एका मोठ्या संकटात सापडली. या भोंगळ कारभारामुळे संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरच खड्ड्यात रुतली एसटी बस, ज्यामुळे बसमधील प्रवाशांचा तब्बल चार तास जीव टांगणीला लागला होता.
रात्री संगमेश्वर एसटी स्थानकाकडे जाणारा हाच सेवा रस्ता असावा, अशा भ्रमात एसटी चालकाची पूर्णपणे दिशाभूल झाली. ठेकेदाराने रस्ता बंद असल्याचा कोणताही फलक न लावल्याने चालकाने बस नेहमीप्रमाणे पुढे घेतली. मात्र, तो रस्ता नसून केवळ मऊ, भुसभुशीत माती आणि महाकाय खड्ड्यांचे साम्राज्य होते. चालकाने गाडी वळवल्यानंतर पुढील काही मीटर अंतरापर्यंत एसटी बस अत्यंत धोकादायक पद्धतीने त्या खड्ड्यांवरून हेलकावे खात पुढे गेली आणि काही समजण्याच्या आतच रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात बसची पुढील दोन्ही चाके खोलवर रुतली. बस एका बाजूला कलून जागेवरच अडकल्याने प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि घराबट निर्माण झाली होती.
या संपूर्ण घटनेत सर्वात मोठी आणि जमेची बाजू म्हणजे नशिबाने त्यावेळी पाऊस नव्हता. जर ऐन पावसाळ्यात किंवा पाऊस सुरू असताना हा प्रकार घडला असता, तर त्या चिखलात आणि पाण्याच्या प्रवाहात एसटी बस आणखी खोलवर रुतून थेट उलटली असती आणि मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ पाऊस नसल्याने एक मोठा अनर्थ टळला, अन्यथा ठेकेदाराच्या निष्काळजीपणा मुळे मोठी दुर्घटना घडून न भरून येणारी हानी झाली असती हे सुद्धा नाकरून चालणार नाही . काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेडिंग करणे, दिशादर्शक फलक लावणे आणि रात्रीच्या वेळी प्रकाशमान होणारे रिफ्लेक्टर्स लावणे हे ठेकेदारावर कायदेशीर बंधनकारक असतानाही, केवळ पैशांची बचत करण्यासाठी प्रवाशांच्या जिवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
ठेकेदाराच्या या गंभीर आणि बेजबाबदार कारभाऱ्याचा सर्वात मोठा फटका निष्पाप चालक, वाहक आणि प्रवाशांना बसला. रात्रीच्या वेळी तातडीने कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने, अखेर बसमधील अबाल वृद्धांना रस्त्यावर उतरावे लागले. एसटीचे चाक कसेही करून त्या जीवघेण्या खड्ड्यातून बाहेर पडावे, यासाठी बसमधील महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांनी स्वतः पुढे येत आजूबाजूला पडलेले मोठमोठे दगड-धोंडे गोळा करण्यास सुरवात केली. भर रात्रीच्या वेळी वृद्ध आणि महिला प्रवाशांनी खड्ड्यात दगड भरून चाकांना तात्पुरता आधार तयार केला आणि उपस्थित नागरिकांसह एसटीला ‘दे धक्का’ दिला. महामार्गाचे काम सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळले जातात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र, ठेकेदाराच्या मर्जीनुसार चालणाऱ्या कारभारावर प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असेच यावरून स्पष्ट होते.
बस मधील व काही खासगी गाड्यामधील प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकवटून केलेले हे सर्व अथक प्रयत्न आणि प्रचंड कष्ट अखेर निष्फळ ठरले. बस वजनाने भारी असल्याने आणि चाके मातीत पूर्णपणे रुतल्याने ती जागची हलली नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रचंड क्षमतेची हायड्रा मशीन घटनास्थळी पाचारण करण्यात आली. परंतु, आव्हान एवढे मोठे होते की, त्या पहिल्या हायड्रा मशीनलाही एसटी बस बाहेर काढण्यात पूर्णपणे अपयश आले.
त्यानंतर घटनास्थळावरील लोकांमध्ये आणि उपस्थितांमध्ये अधिकच धाकधूक वाढली. तातडीने आणखी एक, म्हणजेच दुसरी हायड्रा मशीन मागवण्यात आली. या दोन्ही महाकाय मशीन एकाच वेळी तैनात करून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले. एका हायड्रा मशीनने एसटीचा पुढील भाग पूर्णपणे उचलून धरला, तर दुसऱ्या हायड्राने मागील बाजूने बसला ओढण्यास सुरुवात केली. या दोन-दोन हायड्रा मशीनचा एकाच वेळी वापर करूनही एसटी बस त्या चिखलमय खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला आणि यात बराच वेळ निघून गेला. या सगळ्या भीषण चक्रव्यूहात प्रवाशांना रात्रीच्या वेळी तब्बल चार तास ताटकळत उभे राहावे लागले, प्रवाशांचा जीव पूर्णपणे टांगणीला लागला होता.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी आणि जनतेतून केली जात आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे एखादी जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Comments are closed.