हरिद्वार मध्ये चेंगराचेंगरी; सहा भक्त मरतात
मानसा देवी मंदिरातील दुर्घटना : 29 जखमी
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मानसादेवी मंदिरात रविवारी सकाळी दर्शनासाठी मोठी गर्दी जमली असताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि वैद्यकीय पथके मदत आणि बचावकार्यात गुंतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात रविवारी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती देण्यात आली. मानसा देवी हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले असून तेथे पोहोचण्यासाठी सुमारे 800 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरातील गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 25 पायऱ्या राहिल्या असतानाच चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी संतोष कुमार यांनी सांगितले. याप्रसंगी घटनास्थळी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. काही लोक तिथे लावलेल्या तारा धरून पुढे गेले. यादरम्यान काही तारांमधून वीजेचा धक्का लागल्यामुळे गोंधळ उडाला. याचदरम्यान पायऱ्यांवर पडून लोकांचा मृत्यू झाला. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 35 जण जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, परंतु 6 जणांचा मृत्यू झाला, असे हरिद्वारचे एसएसपी प्रमोद सिंह डोवाल यांनी सांगितले. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे.
मानसा देवी मंदिर हरिद्वारमधील शिवालिक टेकड्यांवर बिल्व पर्वतावर आहे. ते हर की पौडीपासून सुमारे 3 किमी अंतरावर असून 1.5 किमी चढाईच्या मार्गाने किंवा रोपवेने येथे पोहोचता येते.
विद्युत शॉकमुळे चेंगराचेंगरी?
प्राथमिक माहितीनुसार ही घटना पायऱ्यांवर घडली आहे. पायऱ्यांजवळच्या विद्युत तारा आणि लोखंडी खांबांमध्ये करंट असल्याची भीती पसरल्यानंतर भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. तथापि, गढवालचे डीसी विनय कुमार यांनी करंटची बाब फेटाळून लावली आहे. गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी मंदिरात प्रचंड गर्दी जमल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगितले. रविवारी मंदिर परिसरात झालेल्या प्रचंड गर्दीमुळे गोंधळ उडाला असल्याचे सांगण्यात येत आहे. धावपळ आणि धक्काबुक्की केल्यानंतर भाविक एकमेकांवर कोसळू लागले. यामुळे तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपतींना दु:ख
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. उत्तराखंडमधील हरिद्वारमधील मानसा देवी मंदिर मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना मदत करत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला. ‘हरिद्वारमधील मानसा देवी मंदिरात जाताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी खूप वेदनादायक आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. सर्व जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते.’ असे राष्ट्रपतींनी ट्विटरवर लिहिले आहे.
Comments are closed.