कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा ‘या’ बँकेचा निर्णय
स्टँडर्ड चार्टर्ड बँक टाळेबंदी नवी दिल्ली: स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे.
रॉयटर्सच्या अंदाजानुसार या पुनर्रचनेमुळं बँकेच्या 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 7000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जगभरात 82 हजारांहून अधिक लोक काम करतात. बँकेचे सीईओ बिल विंटर्स यांच्या मतानुसार हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी नसून तंत्रज्ञानाच्या बदलाचा भाग आहे.
सीईओ बिल विंटर्स यांच्या मते लोकांना अधिकचं कौशल्य मिळवायचं असून त्यांना पुढं जायचं आहे. आम्ही त्यांना दुसऱ्या पदावर काम करण्याची पूर्ण संधी देत आहे. बँकेनं म्हटलं की काही कर्मचाऱ्यांना नव्या पदांसाठी प्रशिक्षित आणि शिफ्ट केलं जाणार आहे.
AI आणि ऑटोमेशनमुळं बँकिंग बदलणार
बँक सुरक्षा वाढवणे आणि नफा मिळवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर करेल. विंटर्सनं म्हटलं की काही प्रकरणांमध्ये कमी खर्चातील मानवी संसाधनांना वित्तीय आणि गुंतवणुकीच्या साधनांमध्ये बदलण्यासारखं आहे. बँकेच्या माहितीनुसार याचा मोठा परिणाम चेन्नई, बंगळुरु, क्वालालंपूर यासह इतर देशातील बॅक ऑफिसमधील केंद्रावर होणार आहे.
जपानच्या वित्तीय समूहातही कर्मचारी कपात
जपानमधील प्रमुख वित्तीय संस्था ‘मिजूहो फायनान्शिअल ग्रुप’नं यापूर्वीच ऑटोमशन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पुढील 10 वर्षात 5000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली होती.
स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ‘मिजूहो फायनान्शिअल ग्रुप’ यांच्या निर्णयाकडे पाहिलं असता जगभरातील बँकिंग इंडस्ट्रीत एक मोठा बदल येत आहे. वित्तीय संस्था जागतिक बाजारात स्वत:ला स्पर्धाक्षम आणि अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.