लोकसंख्या जनगणना प्रक्रिया सुरू
1 ते 7 नोव्हेंबर या काळात नागरिकांनी माहिती भरून अपलोड करण्याची केंद्र सरकारकडून सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जनगणना करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. या जनगणनेचा अहवाल 2027 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. 1 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 या काळात नागरिकांनी स्वत:च त्यांची माहिती ऑनलाईन भरून अपलोड करायची आहे. यासाठी ‘सेल्फ इन्युमरेशन विंडो’ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही व्यापक प्रक्रिया असून ती अनेक स्तरांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.
1 ते 7 नोव्हेंबरच्या प्रथम स्तराच्या पूर्ततेनंतर 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामधील निवडक घरांची गणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया ‘हाऊस लिस्टिंग अँड हाऊस सेन्सस’ म्हणून ओळखली जाणार असून ती नवी प्रक्रिया आहे. केंद्र सरकारचे नोंदणी महाधिकारी (रजिस्ट्रार जनरल) आणि जनगणना आयुक्त मृत्यूंजय कुमार नारायण यांनी ही माहिती दिली आहे. 1 ते 7 नोव्हेंबर या काळात स्वत:हून माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रेयेला एक पर्यायही उपलब्ध करून देण्यात येईल. लोकसंख्या सर्वसाधारण किती आहे, या हे महितीवरून समजणार आहे.
प्रत्यक्ष जनगणना केव्हापासून…
1 ते 7 नोव्हेंबर आणि 10 ते 30 नोव्हेंबर या कालखंडात हाती घेण्यात आलेल्या प्रक्रिया या पूर्वपरीक्षण म्हणून ओळखल्या जातील. प्रत्यक्ष जनगणना 1 एप्रिल 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या 11 महिन्यांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. ही प्रत्यक्ष जनगणनाही दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. प्रथम टप्पा घरांच्या गणनेचा आणि घरांच्या परिशिष्ट नोंदणीचा (हाऊसलिस्टिंग अँड हाऊस शेड्यूलिंग) असेल. तर द्वितीय टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची शिरगणती केली जाईल. नोव्हेंबर 2025 मध्ये जे पूर्वपरीक्षण केले जाणार आहे, ते या संपूर्ण जनगणना व्यवस्थेची क्षमता आणि सज्जता किती आहे, हे पडताळण्यासाठी केले जाणार आहे. या पूर्व परीक्षणातून जनगणना कार्यात निर्माण होणाऱ्या आव्हानांची पूर्वकल्पनाही येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरातील हे पूर्व परीक्षण महत्वाचे आहे.
घरांची गणना प्रक्रिया
प्रत्यक्ष जनगणना कार्यक्रमाच्या प्रथम टप्प्यात देशातील सर्व घरांची संख्या आणि स्थिती यांची माहिती घेतली जाईल. देशातील घरांची अवस्था काय आहे, कोणत्या घरांमध्ये कोणत्या सोयी सुविधा आहेत किंवा नाहीत, यांची माहिती संकलित केली जाईल. यावरुन देशातील नागरिकांच्या आर्थिक स्थितीही सर्वसाधारण माहिती केंद्र सरकारला मिळणार आहे. घरांची संख्या आणि स्थिती यांचा सर्वंकष आढावा घेण्याचा हा कार्यक्रम देशाच्या इतिहासातील प्रथम असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा टप्पा एकंदर जनगणनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
लोकांची संख्या शोधण्याचा कार्यक्रम
प्रत्यक्ष जनगणनेच्या द्वितीय टप्प्यात देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गणना केली जाणार आहे. व्यक्तीचे नाव, वय, जात, धर्म, उपजिविकेचे साधन, अवलंबित्व, शिक्षण आदी माहिती प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून संकलित केली जाणार आहे. या कामासाठी 34 लाख गणना कर्मचाऱ्यांची आणि निरीक्षकांची नियुक्ती केलाr जाणार आहे. याखेरीज जवळपास 1 लाख 30 हजार गणना अधिकारीही नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती गणना विभागाकडून देण्यात आली आहे.
ही देशाची 16 वी जनगणना
ही देशाची 16 वी जनगणना ठरणार आहे. ती 2021 मध्येच केली जाणार होती. मात्र, कोरोनाच्या उद्रेकामुळे ती होऊ शकली नाही. आता तीच प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि सविस्तर जनगणना असेल, असेही जनगणना आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
जनगणना कार्यक्रम…
चाचणी रन
ड 1 ते 7 नोव्हेंबर- लोकांनी स्वत:लाच ऑनलाईन माहिती अपलोड करावी
ड 10 ते 30 नोव्हेंबर- देशातील घरांची गणना व माहिती संकलित होणार
थेट जनगणना
ड 1 एप्रिल 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या काळात दोन टप्प्यांमध्ये होणार
ड प्रथम टप्प्यात देशातील घरांची संख्या आणि स्थिती यांच्या माहितीचे संकलन
ड द्वितीय टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची गणती आणि माहिती संकलित केली जाणार
कर्मचारी वर्ग
ड प्रत्यक्ष जनगणनेसाठी 34 लाखांहून अधिक गणकांची नियुक्ती केली जाणार
ड याखेरीज जवळपास 1 लाख 30 हजार गणना अधिकारी नियुक्त केले जाणार
Comments are closed.