‘मी लवकर क्रिकेट सुरू करून चूक केली’, राशिद खानचं धक्कादायक वक्तव्य!
अफगाणिस्तानचा प्रमुख लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) याला वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पाठदुखीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. राशिदच्या मते, शस्त्रक्रियेनंतर लगेचच मैदानात परतणं ही त्याची चूक होती. आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये गुजरात टायटन्ससाठी (GT) खेळणाऱ्या राशिदने तब्बल दोन महिन्यांचा ब्रेक घेतला. त्यानंतर तो शपगीजा क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसला. ऑगस्टमध्ये ‘द हंड्रेड’ लीगमध्ये लंडन स्पिरिटविरुद्धच्या सामन्यात त्याने 11 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत राशिद म्हणाला, आयपीएलनंतर मला असा ब्रेक हवा होता, ज्यामुळे माझं शरीर पूर्णपणे सामान्य होईल. मी माझ्या स्ट्रेंथवर थोडं काम केलं. विशेषतः पाठदुखीच्या शस्त्रक्रियेनंतर माझ्याकडे बरे होण्यासाठी जास्त वेळ नव्हता. त्या काळात मी खूप लवकर क्रिकेट सुरू करून चूक केली. मी स्वतःला पूर्ण बरा होण्यासाठी वेळ दिला नाही आणि थोडा ताण दिला, ज्याचा परिणाम आता दिसतोय. आयपीएल (2025) नंतर मला वाटलं, दोन महिने सुट्टी घेऊन फिटनेसवर लक्ष द्यायला हवं.
राशिद खानने अफगाणिस्तानला पुरुष टी20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवलं, पण पाठदुखी आणि हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला बीबीएल आणि पीएसएलमधून बाहेर व्हावं लागलं. जानेवारी 2025 मध्ये तो झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी बुलावायोला परतला. त्या सामन्यात त्याने 55 षटकांत 11 विकेट्स घेत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. पण, त्या मेहनतीचा परिणाम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल 2025 मधल्या त्याच्या कामगिरीवर दिसून आला.
राशिद म्हणाला, शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटमध्ये परतलो तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की लांब पल्ल्याच्या फॉरमॅटमध्ये (टेस्ट आणि वनडे) इतक्या लवकर परतू नकोस, त्याचा फायदा होणार नाही. शस्त्रक्रियेनंतर आठ-नऊ महिन्यांतच बुलावायो कसोटीत मी 55 षटके टाकली. त्यामुळे मला त्रास झाला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं.
त्याने पुढे सांगितलं, मला टेस्ट खेळायला नको होतं. टी20 मध्ये स्वतःला सांभाळता येतं, पण लांब पल्ल्याच्या फॉरमॅटपासून थोडा वेळ दूर राहायला सांगितलं होतं. मी हीच चूक केली, पण टीमची गरज होती. त्या वेळी मी घाई केली आणि स्वतःला वेळ दिला नाही, याची जाणीव नंतर झाली.
आयपीएल 2025 (IPL 2025) संपल्यानंतर राशिदने अमेरिकेतील एमएलसीमधून माघार घेतली आणि रिकव्हरीवर लक्ष केंद्रित केलं. जिममध्ये पाठीच्या खालच्या भागासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग केली. आठवड्यात दोन-तीन वेळा स्पॉट बॉलिंग केली. बॅटिंगचा सरावही सुरू ठेवला. राशिद म्हणाला, आयपीएलनंतर तीन आठवडे मी चेंडूला हात लावला नाही. बहुतेक वेळ मी कुटुंबासोबत घालवला, फिरलो आणि मजा केली. स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी हेच केलं आणि मग पुन्हा लयीत आलो.
Comments are closed.