एमओएची पत्रकबाजी अन् चांदेरेंची मनमानी सुरूच, चांदेरेंच्या पत्रांना मान्यता नसल्याचे एमओएचे जिल्हा संघटनांना निर्देश

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरेंच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हा संघटनांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत महिनाभरापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) राज्य संघटनेच्या कामकाजासाठी अस्थायी समितीची निवड केली. मात्र चांदेरेंनी अस्थायी समितीलाच आव्हान देत त्यांच्या पत्रांना-सूचनांना केराची टोपली दाखवत कबड्डी संघटनेचे कामकाज सुरूच ठेवले. आता राज्य अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली असून एमओएने पुन्हा पत्रकबाजी करत चांदेरेंना अडचणीत आणले आहे.
गेल्या महिनाभरात चांदेरेंनी केलेले पत्रव्यवहार आणि घेतलेले निर्णय बेकायदेशीर असून त्यांच्या पत्रांना-प्रमाणपत्रांना एमओएची मान्यता नसल्याचे पत्र सर्व जिल्हा संघटनांना पाठवले आहे. त्यामुळे चांदेरेंनी राज्याच्या संघनिवडीसाठी नेमलेल्या निवड समितीकडून निवडल्या जाणाऱ्या राज्याच्या संघांना मान्यता नसल्यामुळे खेळाडू द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
कबड्डी खेळाडूंवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील अनेक दिग्गजांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस बाबुराव चांदेरेंच्या मनमानी कारभारावर टीका करत त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती. या तक्रारींची दखल घेत एमओएने महिन्यापूर्वी राज्य संघटनेच्या कामकाजासाठी अस्थायी समितीची निवड केली. या समितीला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेसह हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघानेही (एकेएफआय) या समितीला तत्काळ मान्यताही दिली, मात्र या अस्थायी समितीला चांदेरेंनी संघटनेच्या मार्फत आपला विरोध दर्शवत राज्य कबड्डी संघटनेची सूत्रे आपल्याच हाती कायम ठेवली.
एकीकडे चांदेरे अस्थायी समितीला धुडकावून लावत असताना मान्यता असूनही अस्थायी समितीत असलेल्या दिग्गजांनी चांदेरेंवर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस न दाखवता केवळ पत्रकबाजी केली. त्यामुळे चांदेरेंनी राज्य संघटना म्हणजे आपणच असे समजून कबड्डीचे कामकाज बिनधास्त चालवले आणि बुधवारपासून सुरू झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज स्वतःच केला. आता एमओएने आपण कारवाई करत असल्याचे दाखवण्यासाठी चांदेरेंनी केलेले पत्रव्यवहार आणि घेतलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचे कळवणारे पत्र सर्व जिल्हा संघटनांना पाठवले आहेत.
दुसरीकडे राज्य स्पर्धेवर नजर ठेवण्यासाठी अस्थायी समितीने अशोक शिंदे आणि माया आक्रे या दोन दिग्गज ‘अर्जुन’वीरांची निवड केली आहे. त्यामुळे चांदेरेंनी निवडलेल्या निवड समितीला बाजूला सारून शिंदे आणि आक्रे राज्य संघाची निवड करणार की सामंजस्याची भूमिका घेत निवड समितीकडून निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंची निवड ग्राह्य धरणार, हे लवकरच कळेल.
एमओए राज्य कबड्डी संघटनेची मान्यता रद्द करणार?
एमओएने नेमलेल्या अस्थायी समितीला पाठिंबा द्या असे वारंवार पत्रांद्वारे राज्य कबड्डी संघटनेला कळवले. मात्र एमओएच्या कोणत्याही सूचनांचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरेंनी पालन केले नसून त्यांनी राज्य सरकार आणि राष्ट्रीय कबड्डी महासंघाची मान्यता असलेल्या अस्थायी समितीला विरोध दर्शवत आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला. अस्थायी समितीत सुनील तटकरेंसारखे दिग्गज राजकारणी असूनही त्यांनी चांदेरेंवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल कबड्डी वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, मात्र एमओएने चांदेरेंच्या घटनाबाह्य कारभारावर ठपका ठेवला आहे. त्यांनी कोणतीही मान्यता आणि अधिकार नसतानाही कबड्डीचे कामकाज करून जे व्यवहार आणि पत्रव्यवहार केले आहेत, ते सारे बेकायदेशीर आणि अमान्य असल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे वारंवार कळवूनही चांदेरे आणि कबड्डी संघटनेने अस्थायी समितीला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत राज्य कबड्डी संघटनेची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करू शकते, असे संकेत एमओएचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी दिले आहेत.
Comments are closed.