स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पुर्वी घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. तर मतदार यादीतील घोळावरून निवडणूक आयोगाबाबत जनतेत रोष दिसत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का,याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed.