सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर राहाणार अत्याधुनिक कॅमेऱ्यांची नजर; प्राण्यांच्या हालचाली टिपणार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पावर ड्रोनद्वारे डिजिटल नजर ठेवली जाणार आहे. त्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाचव्या वाघाला शोधणे सोपे होणार आहे.
वन्यजीव संघर्ष वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन आणि आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवासंदर्भातील सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार, प्रशिक्षित पशुवैद्यक आणि तांत्रिक तज्ज्ञांची टीम, एआयआधारित मूव्हमेंट ट्रॅकिंग, डाटा मॉनिटरिंग आणि पोस्ट रीलिज फॉलोअप सारख्या प्रणालींनी सज्ज होणार आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील प्राण्यांच्या हालचालींची रिअल टाईम माहिती मिळणार आहे.
जंगलातील सर्व्हिलन्स अधिक प्रभावी करण्यासाठी नॉर्मल कॅमेरे, हाय रिझॉल्युशन डीएसएलआर, पीटीझेड युनिटस, इन्फ्रारेड कॅमेरे आणि ड्रोन यांचे नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यातून रात्रीच्या हालचाली, अवैध मानवी शिरकाव, जखमी किंवा संकटात सापडलेले प्राणी तसेच प्रजातींचे वर्तन वैज्ञानिक आणि अचूक पद्धतीने निरीक्षण करता येईल. एआयआधारित निरीक्षण प्रणालीमुळे वनक्षेत्रातील हालचालींचे रिअल टाईम नकाशे तयार होऊन हरीण, बिबट्या, अस्वलसारख्या प्राण्यांच्या मार्गांचा डाटा मिळेल.
यातून संघर्षप्रवण झोन ओळखणे अधिक सोपे होणार आहे, तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण किती वाघ आहेत हे समजणार आहे. चांदोली आणि कोयना येथे यापूर्वी तीन अधिकृत वाघ होते. काही दिवसांपूर्वी येथे चौथ्या वाघाला (तारा) येथे सोडण्यात आले आहे. पाचवा वाघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या पायाचे ठसे अनेक ठिकाणी आढळले आहेत. तसेच त्यांने केलेल्या शिकारीवरून चौथा वाघ असल्याचे बोलले जात आहे, मात्र वनविभागाकडे त्याची अधिकृत नोंद नाही. ड्रोनद्वारे त्याला शोधणे सोपे होणार आहे.
आधुनिक प्रणालीमुळे जंगलातील प्राण्यांच्या हालचाली, जखमी प्राणी किंवा अवैध मानवी शिकाव तत्काळ ओळखणे सोपे होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता चार वाघ आहेत. पाचव्याची नोंद झाली तर आनंद होईल. आम्ही ड्रोनद्वारे त्याला शोधण्याचा प्रयत्न करू. हायटेक ट्रॅकिंग सिस्टिममुळे अधिवासातील प्राण्यांचे दैनंदिन पॅटर्न समजण्यास मदत होईल. याशिवाय जंगलातील वणव्यांवरही सॅटेलाईटद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या संपूर्ण प्रणालीमुळे मानवी वन्यजीव संघर्ष रोखण्यास मोठी मदत होईल.
तुषार चव्हाण, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
Comments are closed.