T20 WC26: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल, स्फोटक फलंदाजाची झाली एंट्री

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल झाला आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने २ पैकी एकच सामना जिंकला असल्याने त्यांनी बाकी दोन ग्रुपच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे संघात महत्वाचा बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या जागी स्टिव्ह स्मिथची निवड करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) याला परवाणगी दिली आहे.
हेझलवूडच्या जागी स्मिथचे नाव आधीच सुचविले गेले होते. आता हेझलवूड अधिकृतपणे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याची दुखापत बरी होईल, असे संघ व्यवस्थापकांना वाटले होते मात्र तसे काही झाले नाही. यामुळे स्मिथचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
स्पर्धा मोठी असल्याने खेळाडू बदलण्यासाठी किंवा ठरलेल्या संघात नवा खेळाडू घेण्यासाठी आयसीसीची परवाणगी मिळणे आवश्यक असते, जे आता स्मिथच्या बाबतीत झाले आहे. त्याला १५ जणांच्या संघात स्थान दिले गेले आहे.
स्मिथने रविवारी कॅंडीमध्ये संघासोबत सराव केला. यामुळे त्याला कदाचित श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिच मार्श दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकला असून त्यानेही रविवारी सराव केला. त्याचबरोबर अष्टपैलू मार्कस स्टॉटनिसही फिट असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात डाव्या हाताला दुखापत झाली होती.
ग्रुप बी मध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना आज (१६ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत श्रीलंकेने २ पैकी २ विजय मिळवले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत टिकण्यासाठी आणि श्रीलंकेला सुपर-८मध्ये जाण्यासाठी हा सामना महत्वाचा आहे.
Comments are closed.