शेअर बाजाराची घसरगुंडी सुरूच; IT सेक्टर भुईसपाट, अनेक शेअरमध्ये मोठी घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर हिंदुस्थानी शेअर बाजार दबावात आहे. टॅरिफनंतरही बाजारात मोठी घसरण झाली नव्हती आणि बाजार रिकव्हरी करत असताना ट्रम्प यांनी H1B व्हिसा बॉम्ब फोडला. त्यानंतर बाजाराने सावध प्रतिक्रिया देत सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन दिवसांच्या सलग घसरणीनंतर बुधवारी पुन्हा बाजारात मोठी घसरण दिसून आली. याचा सर्वात जास्त परिणाम आयटी सेक्टरमधील कंपन्यांवर झाला असून अनेक शेअरमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.

आठवड्याच्या तिसऱ्या व्यापार दिवशी बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तीव्र घसरणीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स उघडताच ३०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निरदेशांक निफ्टीदेखील सुमारे 90 अंकांनी घसरणीसह व्यवहार करू लागला. आदल्या दिवशी तेजीत असलेल्या ऑटो शेअर्सना बुधवारी मोठा फटका बसला. टाटा मोटर्सपासून ते अशोक लेलँडपर्यंतचे शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि H1B व्हिसासह जागितक घडामोडींमुळे बाजारात घसरण सुरूच आहे.

बाजाराच्या खराब सुरुवातीदरम्यान सेन्सेक्स निर्देशांक ८१,९१७ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८२,१०२.१० पेक्षा कमी होता. काही मिनिटांतच तो ३८२ पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८१,७२०.२९ वर व्यवहार करत होता. केवळ सेन्सेक्सच नाही तर निफ्टी निर्देशांकही उघडताच घसरला. २५,१०८.७५ वर उघडल्यानंतर, त्याच्या मागील बंद असलेल्या २५,१६९.५० वरून तो १०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून २५,०५३ वर आला.

सुरुवातीच्या व्यवहारात, शेअर बाजारातील ९९४ कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या मागील बंदच्या तुलनेत घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार करू लागले, तर सुमारे १२०४ कंपन्यांचे शेअर्स असे होते की ते किंचित वाढ किंवा तीव्र वाढीसह उघडले. तर १९१ शेअर्सची सुरुवात फ्लॅट झाली, म्हणजेच त्यांच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. ट्रेंट, एसबीआय, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी आणि ओएनजीसीमध्ये तेजी दिसली. तर हिरो मोटोकॉर्प, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँक सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह उघडले.

सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान २४ शेअर्स लाल निशाण्यावर व्यवहार करत होते. यामध्ये टेक महिंद्रा शेअर (१.७१%), टाटा मोटर्स शेअर (१.७०%) आणि भारती एअरटेल शेअर (१%) यांचा समावेश होता. दरम्यान, मिडकॅप श्रेणीतील केईआय शेअर (२.५०%), अशोक लेलँड शेअर (२.३०%) आणि एमफॅसिस शेअर (२%) कमी व्यवहार करत होते. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये, आयआयएल स्टॉक (७.८६%), बजाज कंझ्युमर्स (४.२०%), ऑनवर्ड टेक (३.६०%) आणि अ‍ॅक्सिसकेड्स टेक (३.७०%) घसरणीचे व्यवहार करत होते.

Comments are closed.