शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या 100% टॅरिफच्या घोषणेनंतर अमेरिका-चीन याच्यातील व्यापार युद्ध तीव्र झाले आहे. त्याचा तणाव शेअर बाजारातही जाणवत आहे. या टॅरिफ आणि व्यापार युद्धाच्या धास्तीन गेल्या दोन दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सतत घसरण होत होती. मात्र, बुधवारीबाजार सुरू होताच ही घसरण थांबल्याचे दिसून आले. बाजार उघडताच, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३०० पेक्षा जास्त अंकांनी वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही 100 पेक्षा जास्त अंकांनी वाढ झाली.
या आठवड्यात दोन दिवस सातत्याने घसरण होत होती. मात्र, बुधवारी तिसऱ्या दिवशी ही घसरण थांबली आहे. बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स ८२,१९७.२५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८२,०२९.९८ पेक्षा जास्त होता. लवकरच तो वेगाने वाढत ८२,३८४ वर व्यवहार करत होता. तसेच निफ्टीमध्येही सेन्सेक्सप्रमाणेच वाढ झाली. तो २५,१४५ च्या मागील बंदपेक्षा २५,१८१.९५ वर उघडला आणि नंतर २५,२५७.२५ वर पोहोचला.
जागतिक पातळीवर मिश्र संकेत मिळत असले तरीही भारतीय बाजाराने चांगली सुरुवात केली. व्यवहार सुरू होताच, बाजारातील सुमारे १३२३ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये उघडले, जे त्यांच्या मागील बंदपेक्षा वेगाने वाढले. ८८३ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह व्यवहार करू लागले. दरम्यान, १४८ कंपन्यांचे शेअर्स फ्लॅट उघडले. जिओ फायनान्शियल, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्स हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या शेअर्समध्ये होते. दरम्यान, टेक महिंद्रा, टायटन कंपनी, अॅक्सिस बँक आणि सिप्ला यांच्यात घसरण झाली.
टाटा मोटर्सच्या विलयानंतर मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. तर बुधवारी हा शेअर सर्वात वेगाने उसळी घेणाऱ्या शेअर्समध्ये होता. टाटा मोटर्सचा शेअर सुरुवातीच्या वेळी जवळपास 2% वाढून ४०३ रुपयांवर पोहोचला. तथापि, त्यानंतर टाटाच्या या शेअरची गती मंदावल्याचे दिसून आले. टाटा मोटर्सचे मार्केट कॅप १.४६ लाख कोटी रुपये आहे. लार्ज कॅप कॅटेगरीत एशियन पेंट्स (१.५०%), एनटीपीसी (१.४०%) आणि बजाज फिनसर्व्ह (१.३०%) हे जास्त ट्रेडिंग करत होते. याशिवाय, मिडकॅप कॅटेगरीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये पर्सिस्टंट शेअर (६.८३%), टाटा कॉम (४.७६%), महाराष्ट्र बँक शेअर (३.३०%), कोफोर्ज शेअर (२.७०%) जास्त ट्रेडिंग करत होते. जर आपण स्मॉलकॅप कंपन्यांकडे पाहिले तर, जेनेसिस शेअर (११.५७%) आणि तत्व शेअर (९%) वाढत होते.
Comments are closed.