हेराफेरी होत असेल तर निवडणुकीत सहभागी होणे थांबवा.
सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांचे विरोधी पक्षांना आवाहन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली :
कोक्रॉच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले आहे की, जर त्यांना निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी होत आहे असे वाटत असेल, तर त्यांनी निवडणुकीत भाग घेणे थांबवावे. निवडणुकीत सतत भागघेतल्याने ज्यांच्यावर ते स्वत:च प्रश्न उपस्थित करतात त्या निवडणुकांना वैधता मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये दीपके म्हणाले की, विरोधी पक्ष निवडणूक लढवत असताना निवडणुकांमध्ये हेराफेरी होत असल्याचा दावा करू शकत नाहीत. ‘होय, निवडणुकांमध्ये हेराफेरी होत आहे. पण जेव्हा तुम्ही हेराफेरी झालेल्या निवडणुकांमध्ये सहभागी होत राहता तेव्हा तुम्ही या निवडणुकांना वैधता देता आणि त्या मुक्त व निष्पक्ष असल्याचा भ्रम टिकवून ठेवण्यास मदत करता’, असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष निवडणुकांपासून दूर राहिल्यास आपले राजकीय अस्तित्व गमावण्याच्या भीतीनेच निवडणुका लढवत राहतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सीजेपीच्या संस्थापकांनी विरोधी पक्षांवर निवडकपणे निवडणूक गैरप्रकारांचे आरोप केल्याचाही ठपका ठेवला आहे. ‘तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये निवडणूक गैरप्रकार घडल्यावर तुम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही आणि इतरत्र असे घडल्यावर गप्प बसू शकत नाही. निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असतील, तर राज्य कोणतेही असो किंवा कोणताही पक्ष प्रभावित झालेला असो, ती बाब महत्त्वाची ठरायला हवी. तुम्ही खेळत राहूनच खेळात हेराफेरी झाली आहे असे म्हणत राहू शकत नाही’, असे मत दीपके यांनी व्यक्त केले आहे.
Comments are closed.