भारत पाकिस्तानमध्ये तणाव असताना कपिल देव, सुनील गावस्कर यांची पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर काही खेळाडू एका मागणीसाठी एकत्र आले आहेत. त्यांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून एक मागणी केली आहे. एकाबाजूला भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघात आशिया चषकापासून तणाव पाहायला मिळत आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवरील आणि क्रिकेटच्या मैदानावरील परिस्थिती बदलली. मात्र सुनील गावसकर आणि कपिल देव यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंशी आणि एक खेळाडू म्हणून आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे काही वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. इम्रान खान यांच्या तीन बहिणींनी रावळपिंडीमधील कारागृहाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानुसार इम्रान खान यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली असल्याचे समजते. अशा परिस्थितीत इम्रान खान यांना पुरेशी आणि तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांची प्रतिष्ठा राखली जावी, याबद्दल जागतिक स्तरावरील खेळाडू एकत्र आले आहेत.

१७ फेब्रुवारी रोजी माजी कर्णधारांनी एक संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. ज्यात इम्रान खान यांच्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली. जवळपास अडीच वर्षांपासून इम्रान खान कारागृहात आहेत. या निवेदनावर कपिल देव, सुनील गावसकर यांच्यासह मायकेल आथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल ब्रेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, क्लाइव्ह लॉयड, स्टीफन वॉ आणि जॉन राईट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या संयुक्त निवेदनात म्हटले गेले आहे, “आम्ही आमच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार आहोत. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तिमत्व इम्रान खान कारागृहात दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्या प्रकृतीविषयी समोर येत असलेल्या माहितीबद्दल आम्हाला चिंता वाटते.”

इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेटसाठी दिलेले योगदान आणि १९९२ चा क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी या निवेदनात लिहिले गेले आहे. इम्रान खान यांचे नेतृत्व आणि खिलाडू वृत्तीमुळे पाकिस्तानला हा विजय मिळाल होता. त्यापासून सीमेपलीकडेही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली गेली.

Comments are closed.