एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार थांबवा!

केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश : एलपीजी-इंधन पुरवठा रितसर सुरू असल्याचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्य-पूर्वेतील युद्धामुळे भारतासह जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. भारतातील विविध राज्यांमधूनही गॅस सिलिंडर टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याने लोक सिलिंडर मिळविण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. सरकार वेळोवेळी याबाबत सूचना करत असले तरी लोकांमध्ये अजूनही घबराट आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी  शुक्रवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यांनी लोकांना अफवा टाळण्याचा आणि घाबरून खरेदी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच राज्य सरकारांना महत्त्वाचे निर्देश देताना गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची सूचना केली.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता भारतीय स्वयंपाकघरांवर पोहोचला आहे. तेल आणि वायूचा सर्वात मोठा पुरवठा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या जवळपास अडथळ्यामुळे भारतात एलपीजी सिलिंडरची कमतरता, किमती वाढणे आणि सिलिंडरसाठी लांब रांगा लागल्या आहेत. देशभरातील लोकांना सिलिंडर बुकिंगमध्ये विलंब होत आहे, तर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. विरोधी पक्ष सरकारवर कठोर टीका करत आहेत, परंतु केंद्र सरकार देखील या संकटाला तोंड देण्यासाठी जलद पावले उचलत आहे.

वाढत्या बुकिंगबाबत गंभीर चिंता व्यक्त

सहसचिव सुजाता शर्मा म्हणाल्या, ‘मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून खरेदी करण्यापासून दूर राहा. आमचे सरासरी बुकिंग दररोज सुमारे 50 ते 55 लाख बुकिंग होत होते. तथापि, गेल्या काही दिवसांत बुकिंग सुमारे 75-76 लाखांपर्यंत वाढले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे कॉल सेंटर देखील मजबूत केले गेले आहेत. कॉल सेंटरने त्यांची बसण्याची क्षमता 400 पर्यंत वाढवली आहे आणि टेलिफोन लाईन्सची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे लोकांना त्यांच्या तक्रारी नोंदवता येतील. काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्धही कारवाई केली जात आहे’, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोल-डिझेल उत्पादनाबाबत स्पष्टीकरण

सहसचिव सुजाता शर्मा यांनी इंधन पुरवठ्याबाबतही माहिती दिली. भारताची एकूण शुद्धीकरण क्षमता 258 दशलक्ष मेट्रिक टन आहे. देश पेट्रोल आणि डिझेल उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. सर्व रिफायनरीज सध्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुरेसे कच्चे तेलाचे साठे आहेत. परिणामी, पेट्रोल आणि डिझेल आयात करण्याची गरज नाही. देशभरातील सर्व पंपांनाही कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा केला जात असल्याने वाहनधारकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एलपीजी वितरणात कोणताही व्यत्यय नाही!

देशभरातील 25,000 हून अधिक एलपीजी वितरकांमध्ये कोणत्याही ठिकाणी गॅस खंडित झालेला नाही, असे शर्मा यांनी एलपीजी पुरवठ्याबाबत सांगितले. घरगुती ग्राहकांना व्यत्यय न येता एलपीजी पुरवले जात आहेत. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी सिलिंडर प्राधान्याने दिले जात आहेत. तसेच आता व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही वाढवल्यामुळे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना कोणतीही समस्या येणार नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यांनी व्यावसायिक ग्राहकांना कोणत्याही माहितीसाठी त्यांच्या स्थानिक शहर गॅस वितरण नेटवर्क किंवा अधिकृत डिलर्सशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

देशांतर्गत एलपीजी उत्पादनात 30 टक्के वाढ

5 मार्चच्या तुलनेत रिफायनरीजमधील घरगुती एलपीजी उत्पादनात अंदाजे 30 टक्के वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर राज्य सरकारांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत जेणेकरून ते प्राधान्यक्रमित गरजांनुसार वितरित करता येतील. घरगुती ग्राहकांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) आणि संकुचित नैसर्गिक वायू (सीएनजी) पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू असल्याचे सांगितले. सुजाता शर्मा यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गॅस सिलिंडर किंवा इंधन पुरवठ्याबाबत घाबरू नका असे आवाहन करून देशात तेल आणि वायूची पुरेशी उपलब्धता असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले.

Comments are closed.