सेंट रेजीस हॉटेलात तुफान ‘राडा’, भाजपच्या ‘घुसखोरां’ना शिवसैनिकांचा इंगा

वरळीतील सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेची मान्यताप्राप्त कामगार युनियन असताना या ठिकाणी आज भाजपने आपल्या संघटनेचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केल्याने मोठा राडा झाला. शिवसेनेच्या युनियनकडे 900 कामगारांची नोंद आहे. ते अधिकृत सदस्य आहेत, तर भाजपला केवळ आठ ते दहा कामगारांचा पाठिंबा आहे. तरीही घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया भाजपला शिवसैनिकांनी इंगा दाखवला. भाजपचे बोर्ड लावण्याचे कारस्थान शिवसेनेने उधळून लावले. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला.

वरळी येथील सेंट रेजीस हॉटेलमध्ये गेल्या 12 वर्षांपासून शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेची मान्यताप्राप्त युनियन आहे. फक्त दहा ते बारा कामगार वगळता शिवसेनेच्या युनियनकडे शेकडो कामगार आहेत. असे असताना भाजपच्या युनियनकडून या ठिकाणी बोर्ड लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. सहचिटणीस निशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युनिट अध्यक्ष विवेक करलकर, प्रथमेश पाटील, निजाम शेख, विनय परदेशी, जयेश निजाई, गणेश सुर्वे, प्रमोद दुबे आदी उपस्थित होते.

पुन्हा प्रयत्न कराल तर याद राखा!

भाजपच्या कामगार संघटनेचा बोर्ड लावण्याच्या कार्यक्रमासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी येणार होते. मात्र शिवसैनिकांच्या संतापाची माहिती मिळताच नेते या ठिकाणी फिरकलेच नाहीत. भाजपने स्वतःचे कार्यकर्ते न आणता एअरपोर्टसारख्या ठिकाणचे गुंडच आणले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. मात्र भाजपला शिवसेना स्टाईल दणका दाखवल्याने त्यांनी पळ काढला. पुन्हा असा प्रयत्न कराल तर याद राखा, असा इशाराच यावेळी शिवसेनेने भाजपला दिला आहे.

Comments are closed.