होर्मुझच्या लाल रेषेची वाट आणखी बिकट; इकडे इराण तिकडे अमेरिकेचे नौदल, ट्रम्प यांनी जहाज रोखण्याची दिली धमकी
पाकिस्तानात युद्धबंदीसंदर्भातील वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून जगाचे टेन्शन वाढवले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांकडून टोल घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझ पार करणाऱ्या जहाजांना अमेरिका रोखणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शांततेच्या चर्चेनंतर आता पुन्हा इराण आणि अमेरिकेतील संघर्ष चिघळण्याची भीती आहे.
पाकिस्तानात झालेली चर्चा होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणची अण्वस्त्र क्षमता याच मुद्दय़ांवरून फिसकटली. इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा हवा आहे तर, ट्रम्प त्या विरोधात आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी धमकी दिली आहे, की इराणने सामुद्रधुनीचा मार्ग उघडण्याचा शब्द पाळला नाही. तेथे समुद्रात सागरी सुरुंग पेरण्यात आलेले आहेत. त्यामुळे तेथून जाणाया जहाजांना धोका कायम आहे. त्यामुळे आता अमेरिकेचे नौदल होर्मुझमधून बाहेर पडणाऱया जहाजांना रोखणार. ज्यांनी इराणला टोल दिला आहे, अशा जहाजांवर नजर ठेवण्यात येईल. जे जहाज इराणला बेकायदा टोल देतील, त्यांना सुरक्षित मार्ग मिळणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी तेहरानची लाल रेषा – इराण
इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई यांनी सांगितले की, हा होर्मुझचा मार्ग इराणच्या नियंत्रणात आहे. हा मार्ग म्हणजे तेहरानची लाल रेषा असून तेथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणच्या रियाल या चलनात टोल द्यावा लागेल.
ट्रम्प यांची चीनला टॅरिफची धमकी
चीनने इराणला मदत केल्यास अमेरिका त्यावर मोठय़ा प्रमाणावर कर लादेल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणला लष्करी मदत देताना पकडला गेल्यास चीनला 50 टक्क्यांपर्यंत शुल्काचा सामना करावा लागेल. ट्रम्प पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील.
इस्लामाबादमधील फ्लॉप शोनंतर आता पुतीन पुढे सरसावले
पाकिस्तानात झालेल्या शांतता वार्तेचा फ्लॉप शो पाहून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. इराणच्या संघर्षावर राजकीय आणि मुत्सुद्दी तोडगा काढायला तयार असल्याचे पुतीन यांनी सांगितले.
इस्रायलचे लेबनॉनमध्ये हल्ले
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेदरम्यानच, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचे प्राणघातक हल्ले रात्रभर सुरू राहिले. इस्रायली लढाऊ विमानांनी दोन शहरांवर हवाई हल्ले केले. दुसरीकडे तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. ‘मारूब’ शहरात एका घरावर हल्ला करून एकाच कुटुंबातील सातहून अधिक सदस्यांना लक्ष्य करण्यात आले; या हल्ल्यात अनेक लोक ठार झाले असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
Comments are closed.