सहा महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी सहा हजार भिवंडीकरांचे लचके तोडले; उपजिल्हा रुग्णालयाची धक्कादायक आकडेवारी

भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत वाढली आहे. मागील सहा महिन्यांत शहरात सहा हजारांहून अधिक नागरिकांचे लचके तोडल्याचे उघड झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रस्त्यावरून चालताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून दोन दिवसांपूर्वी शहरातील दर्गा रोड परिसरातील एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी ११ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. यापैकी एक इमारतीमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीवर श्वानाने चढवलेला हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

यामुळे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीवरून भिवंडीत जानेवारी १०६६, फेब्रुवारी १०४२, मार्च ११०४, एप्रिल ९८८, मे १०००, जून ६८९ व १५ जुलै २०२५ या पंधरा दिवसांमध्ये ३६१ असे सहा महिन्यांत एकूण ६२५० श्वानदंश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

3275 श्वानांवर निर्बिजीकरण
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने तत्कालीन आयुक्त अजय वैद्य यांनी 12 वर्षे बंद असलेले श्वान निर्बिजीकरण केंद्र पुन्हा सुरू केले आहे. हैदराबादच्या ‘वेट्स सोसायटी फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ संस्थेला पाच वर्षांसाठी या कामाचा ठेका देण्यात आला आहे. या संस्थेस प्रतिश्वान निर्बिजीकरण करण्यासाठी १४५० रुपये दिले जात आहेत. ११ नोव्हेंबर २०२४ ते १५ जुलै २०२५ या दरम्यानच्या काळात शहरातील एकूण ३२७५ श्वानांवर निर्बिजीकरण व रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती स्वच्छता विभागाचे प्रमुख फैजल तातली यांनी दिली आहे.

Comments are closed.