ठाण्यातील भटक्या कुत्र्यांचा 24 तासांत होणार बंदोबस्त, पालिकेची डे-नाईट हेल्पलाइन तक्रार येताच अ‍ॅक्शन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा आता 24 तासांत बंदोबस्त होणार आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने डे-नाईट हेल्पलाईन सुरू केली आहे. तक्रार येताच तत्काळ अॅक्शन घेण्यात येणार आहे. तसेच मोकाट कुत्र्यांना पकडणे आणि नंतर त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहिमेला पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

मागील वर्षात भटक्या श्वानांनी तब्बल 12 हजार 465 ठाणेकरांना भटका कुत्रा चावला असल्याची बाब समोर आली आहे. विविध ठिकाणी या कुत्र्यांनी हैदोस घातला असून नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. याशिवाय खासगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्यादेखील बहुतांश आहे. वर्षभरापूर्वी भटक्या कुत्र्याच्या चाव्यात दिव्यातील चार वर्षांची चिमुरडीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या तक्रारीसाठी 8429052905 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

माजिवडा उड्डाणपुलाखाली नवीन केंद्र

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोकाट श्वान, मांजरी तसेच इतर प्राण्यांसाठी ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर कुत्रे पकडण्यासाठी ‘अमृत’ या खासगी संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यात वागळे इस्टेट येथे निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी मोहीम सातत्याने राबविणे गरजेचे आहे, परंतु प्रशासनाने काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्याने श्वानांचा उपद्रव वाढला होता.

ठाणे शहरात श्वानांची संख्या ८० हजारांच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे पाच हजार पाळीव श्वान असल्याचा दावा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे.

Comments are closed.