ई-सिगारेट प्रकरणात कठोर दंड शक्य.
लोकसभा अध्यक्षांचा खासदारांना महत्वाचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभागृहात खासदारांनी ई&-सिगारेटस्चा उपयोग केल्याप्रकरणी कठोर शिक्षा देण्याचा संकेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि खासदार किर्ती आझाद यांच्यावर सभागृहा ई&-सिगारेटस्चे सेवन केल्याचा आरोप नुकत्याच संपलेल्या शीतकालीन अधिकवेशनात करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी होत आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अशा प्रकारच्या वर्तनावर पूर्णत: बंदी आहे. तरीही तृणमूल काँग्रेसचे खासदार सभागृहात कामकाज होत असताना ई-सिगारेट या साधनाचा उपयोग करतात, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा सदस्य अनुराग ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या संबंधातील तक्रार सादर केली असून चौकशी होत आहे.
सभागृहाचे पावित्र्य महत्वाचे
कोणत्याही सदस्याला सभागृहाच्या पावित्र्याचा भंग करण्याचा अधिकार नाही. माझ्याकडे काही खासदारांच्या विरोधात अशा प्रकारच्या तक्रारी आल्या असून त्यांची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. हे खासदार दोषी असल्याचे आढळले, तर त्यांना अत्यंत कठोर आणि स्मरणात राहील, अशी शिक्षा देण्यात येईल. सभागृहाचे नियम आणि पावित्र्य यांच्यासंदर्भात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या सूचनांच्या अनुसार सदर खासदारांवर कारवाई केली जाईल, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाचे उत्तरदायित्व
लोकसभा आणि राज्यसभा अशा अत्युच्च सभागृहांच्या सन्मानाचे रक्षण करणे, ही अशा सभागृहांच्या प्रत्येक सदस्याचे उत्तरदायित्व असते. सभागृहाच्या प्रतिष्ठेशी खेळ केल्यास अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. सभागृहाचा सन्मान पायदळी तुडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सैल सोडले जाणार नाही. नियमांचा भंग ज्याच्या हातून होईल, त्याला संसदेच्या नियमांच्या अनुसार शिक्षा केली जाईल. कोणाही संबंधिताला कोणतीही दयामाया दाखविली जाणार नाही. नियमांचे पालन करणे हे प्रत्येकासाठी अनिर्वाय आहे, असे ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.