ठाण्यातील सर्व शाळांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात पालिका क्षेत्रातील ७६९ खाजगी व १०२ महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. या संरचनात्मक तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था व वीरमाता जिजाई तांत्रिक संस्थेला परीक्षण करून घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात २०९ अनुदानित आणि ५६० विनाअनुदानित अशा एकूण ७६९ खाजगी शाळा आहेत. याशिवाय ठाणे महापालिकेच्या १०२ शाळांपैकी ९५ शाळा प्राथमिक तर ७ माध्यमिक शाळा आहेत. महापालिकेच्या ७६ शाळांपैकी ७ इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आणत काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच महापालिकेला शाळांसाठी मिळणारे ३५९ कोटी ३४ लाख रुपयांच्या अनुदानाचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. तसेच खाजगी शाळांचा मुद्दाही उपस्थित केला होता. यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने पालिका क्षेत्रातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्याध्यापकांना पत्र

महापालिका क्षेत्रातील शाळांनी आयआयटी आणि व्ही.जे.टी.आय. या संस्थांमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच विद्यार्थी संख्येनुसार अद्ययावत प्रयोगशाळा, शौचालये, कँटीन आणि विश्रांतीगृह, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे पत्र उपआयुक्त सचिन सांगळे यांनी सर्व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

Comments are closed.