बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी संघर्ष
भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी मांझी, कुशवाह, चिराग पासवान दिल्लीत : आज घडणार महत्त्वाच्या घडामोडी
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आज सोमवारी राज्यपालांकडे राजीनामा सादर करतील आणि त्याच दिवशी नवीन सरकार स्थापनेचा दावा देखील करू शकतात. जेडीयूने सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून याप्रसंगी नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी पुन्हा निवड केली जाईल. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही सोमवारीच अपेक्षित आहे. सरकार स्थापनेबाबत आरएलजेपी, एचएएम आणि आरएलएमच्या नेत्यांसोबत दिल्लीत महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात आहेत. बिहारमधील नवीन एनडीए सरकारची रचना पुढील 48-72 तासांत स्पष्ट होईल आणि मंत्रिपदांची यादी देखील अंतिम होण्यास सुरुवात होईल.
2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु नितीश कुमार यांच्या जेडीयूनेही दमदार यश मिळविल्यामुळे तेच पुन्हा एकदा सरकारचे नेतृत्त्व करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या आठवड्यातच नितीश कुमार यांच्यासह 18 मंत्रीही शपथ घेऊ शकतात. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपकडून सम्राट चौधरी, रामकृपाल यादव आणि मंगल पांडे यांची नावे चर्चेत आहेत. चिराग पासवान यांचा पक्ष, लोजपा (आर) बिहार सरकारमध्ये प्रवेश करणार असून त्यांनीही महत्त्वाचे मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री भवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात.
बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आता एकमताकडे जात आहे. सरकार स्थापनेबाबत भाजप आणि जेडीयूमध्ये पहिल्या फेरीतील चर्चेचा निकाल लागला आहे. मंत्रिमंडळ सहभागाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर चर्चा पुढील टप्प्यात गेली आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एका मंत्रिपदाचा फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत असल्याचे दिसून येते. ही चौकट अंतिम करण्यासाठी जेडीयूने दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण केली आहे. आता जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा दिल्लीतील चर्चेनंतर थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेत सरकार स्थापनेशी संबंधित प्रमुख मुद्यांसाठी रोडमॅप सादर करतील. पटना येथे पोहोचल्यानंतर ते जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची आणि एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तयारी देखील पुढे नेतील.
भाजप हायकमांडची मित्रपक्षांशीही चर्चा
भाजप आता सरकार स्थापनेबाबत त्यांच्या उर्वरित मित्रपक्षांशी चर्चा करत आहे. या अनुषंगाने एचएएमचे संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी रविवारी गया येथून दिल्लीत पोहोचले. या भेटीत मांझी हे गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ भाजप नेत्यांना भेटणार आहेत. उपेंद्र कुशवाह हेदेखील पाटणा येथून दिल्लीला रवाना झाले होते. ते दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, चिराग पासवान देखील रविवारी पाटणा येथून दिल्लीला पोहोचणार आहेत.
जेडीयू आणि भाजपचे समसमान मंत्री
नव्या मंत्रिमंडळात 30-32 मंत्री असू शकतात. जेडीयू आणि भाजपमध्ये समान संख्येने मंत्री असू शकतात. चिराग पासवान यांच्या पक्षाला तीन मंत्रिपदे मिळू शकतात, तर जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळू शकते. विधानसभेच्या सध्याच्या संख्येनुसार, बिहारमध्ये एकूण 36 मंत्री नियुक्त केले जाऊ शकतात. साहजिकच, जेडीयू कोट्यातून 11 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. मागील सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून 13 मंत्री होते. यापैकी 10 मंत्र्यांना नवीन सरकारमध्ये पुन्हा नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. पक्ष मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या मनस्थितीत नाही.
2020 च्या निवडणूक निकालानंतर, भाजपने बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याची परंपरा सुरू केली. पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केल्यास भाजपसोबतच एलजेपी (आर) देखील एका उपमुख्यमंत्रिपदासाठी दावा करू शकते. तथापि, जर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोण असेल हे भाजप हायकमांडच ठरवेल. मागील सरकारमध्ये भाजपने आपल्या कोट्यातून 19 मंत्रिपदे मिळवली होती.
18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शपथविधी
सोमवारी रात्री नितीश कुमार सरकारची अंतिम मंत्रिमंडळ बैठक होईल. त्यात विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल. त्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर केला जाईल. नवीन सरकारचा शपथविधी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळाच्या नियुक्तीबाबत जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा आणि केंद्रीय मंत्री लल्लन सिंह शनिवारी रात्री दिल्लीत पोहोचले होते. त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. यापूर्वी, दोन्ही जेडीयू नेत्यांनी पाटणा येथे नितीश कुमार यांच्याशीही सल्लामसलत केली होती.
Comments are closed.