तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला

वृत्तसंस्था/ कोइम्बतूर

तामिळनाडूच्या कोइम्बतूर विमानतळानजीक एका विद्यार्थिनीचे अपहरण करत तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. हा प्रकार समोर येताच खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  संबंधित विद्यार्थिनी कोइम्बतूरच्या एका खासगी महाविद्यालयात शिकत असून ती एका मित्रासोबत कारमध्ये बसली होती. आरोपींनी प्रथम या विद्यार्थिनीच्या मित्रावर हल्ला करत तिचे अपहरण केले आणि बळजबरीने तिला अन्य ठिकाणी नेले होते. तेथेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

पीडितेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगत पोलीस अधिकाऱ्याने 7 विशेष पथके आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.  पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत असून संभाव्य साक्षीदारांची चौकशी केली जात आहे. तामिळनाडूत महिलाविरोधी लैंगिक गुन्ह्यांवरुन लोकांची चिंता वाढत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्ष आता कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत.

तामिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. असामाजिक घटकांना कायदा किंवा पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही. द्रमुक मंत्र्यांपासून कायदा अंमलबजावणी यंत्रणा देखील लैंगिक गुन्हेगारांना वाचवू पाहत असल्याचा आरोप भाजप नेते के. अण्णामलाई यांनी केला आहे.

Comments are closed.