विद्यार्थ्यांचा निषेध : टीव्हीचा यू-टर्न
सहभागी होण्यावरील बंदीचा आदेश घेतला मागे
► वृत्तसंस्था/ चेन्नई
विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालणारा आदेश तामिळनाडू सरकारने मागे घेतला आहे. या आदेशाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने तो मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आणि युवकांनी सामुहिकरित्या डावे पक्ष आणि कॉक्रोच जनता पार्टीसारख्या संघटनांच्या आंदोलनांमध्ये भाग घेऊ नये. म्हणून हा आदेश लागू करण्यात आला होता. पण तो मागे घेण्यात आला.
हा वादग्रस्त आदेश राज्याच्या महाविद्यालयीन शिक्षण विभागाने लागू केला होता. तो आदेश राज्य सरकारच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच युवकांकरिता काढण्यात आला होता. या आदेशाचे पालन करण्याचे उत्तरदायित्व सरकारी महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर टाकण्यात आले होते. प्राचार्यांनी यासंदर्भात पोलीस आधिकारी आणि राज्ययंत्रणा यांच्याशी सहकार्य करावे, अशी सूचना या आदेशाद्वारे करण्यात आली होती. प्राचार्यांना तशी पत्रेही पाठविण्यात आली होती. तथापि, या आदेशाला प्रचंड विरोध करण्यात आला. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी सोशल मिडियावरुन या आदेशाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे राज्य सरकारने पाऊल मागे घेतले आहे.
भाजपची टीका
राज्य सरकारने आदेश मागे घेण्याच्या कृतीवर भारतीय जनता पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पक्षाचे नेते विनोज पी. यांनी डाव्या संघटना आणि कॉक्रोच जनता पार्टीवर टीका केली. या संघटना विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गापासून भरकटवत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना या संघटना त्यांना आंदोलनाच्या मार्गाकडे वळवून त्यांचे करिअर बिघडवित आहेत. तामिळनाडू सरकार दबावाला बळी पडून हा आदेश मागे घेत असून ही कृती योग्य नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी या धरसोड वृत्तीवर टीका केली. मुळात असा आदेश काढावयास नको होता. काढल्यानंतर मागे घ्यायला नको होता. राज्य सरकार दबावाला बळी पडत असून ते अकार्यक्षम आहे. या राज्य सरकारने आतापर्यंच्या केवळ 100 दिवसांच्या काळात अनेकदा ठरलेले निर्णय बदलले आहेत, अशी टीका राज्य भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.
Comments are closed.