निमित्त – संकल्प स्वस्तात उपग्रहनिर्मितीचा

>> महेश कोळी

भारतातील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वसतिगृहाच्या खोलीत बसून स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून एक स्वस्त सॅटेलाईट विकसित केला आहे, जो अवकाशातील `गॅमा रे’ म्हणजेच गॅमा किरणांचा शोध घेण्यास सक्षम आहे. स्मार्टफोनवर आधारित एका अॅप्लिकेशनचा वापर करून या विद्यार्थ्यांनी हे सिद्ध केले आहे की, प्रगत अवकाश संशोधन केवळ मोठय़ा संस्थांपुरते मर्यादित नाही.

ओडिशातील स्नेहदीप कुमार आणि मोहित कुमार नायक या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अवकाश संशोधनात नवा इतिहास रचला आहे. `नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन’ या आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी भारताचा पहिला `गॅमा रे डिटेटिंग युबसॅट’ (गॅमा किरणांचा शोध घेणारा छोटा उपग्रह) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, ज्या उपकरणांसाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च येतो, ती उपकरणे या विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्यातून अत्यंत कमी खर्चात तयार केली आहेत.

अवकाश संशोधनातील साहित्याची किंमत गगनाला भिडलेली असते. स्नेहदीप यांच्या मते, जे `अॅल्युमिनियम 7075′ अवकाश पुरवठादारांकडून लाखो डॉलर्सना मिळते, तेच त्यांनी भुवनेश्वरमधील स्थानिक धातूच्या दुकानातून अवघ्या 700 रुपयांत मिळवले. त्यांनी संशोधनातून हे सिद्ध केले की, कल्पकता आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर अवाचेसवा खर्च टाळूनही दर्जेदार उपग्रह बनवणे शक्य आहे. या विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा आणि स्मार्टफोन-आधारित प्रणालींचा वापर करून जटिल वैज्ञानिक प्रक्रिया सुलभ केल्या आहेत.

अवकाश संशोधन केवळ श्रीमंत संस्थांपुरते मर्यादित राहू नये, तर ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध व्हावे, हेच या तरुणांचे उद्दिष्ट आहे.

स्नेहदीप यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आणि अवकाशाची ओढ होती. त्यांनी सुरुवातीला `अरोरा अकॅडमी जर्नल’च्या माध्यमातून तरुण संशोधकांना व्यासपीठ मिळवून दिले. पुढे भुवनेश्वरमधील वसतिगृहात त्यांची भेट मोहित यांच्याशी झाली आणि तिथूनच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या या उपग्रहाचा मुख्य उद्देश कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि वैश्विक स्फोटांमधून उत्सर्जित होणाऱ्या गॅमा किरणांचा अभ्यास करणे हा आहे.

या दोन तरुणांची कामगिरी म्हणजे देशातील युवाशक्तीच्या सर्जनशीलतेचे आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक ठरली आहे. संसाधनांची कमतरता असली तरीही मोठय़ा वैज्ञानिक कल्पना प्रत्यक्षात उतरवता येतात हेच या `नेब्युला स्पेस`च्या यशोगाथेने जगाला दाखवून दिले आहे. महागडय़ा उपकरणांवर अवलंबून न राहता त्यांनी सीएनसी मशीनच्या सहाय्याने स्थानिक पातळीवर उपग्रहांचे सुटे भाग तयार करून खर्च कमी केला आहे.

हा `युबसॅट’ आकारमानाने अत्यंत लहान आणि वजनाने हलका आहे. साधारणपणे एका मोठय़ा डब्याच्या आकाराचा असणारा हा उपग्रह अवघ्या 1.33 किलो वजनाचा आहे. पारंपारिक उपग्रहांच्या तुलनेत याचे वजन अत्यंत कमी असल्यामुळे तो अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा खर्चही मोठय़ा प्रमाणावर कमी होणार आहे. या उपग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे, यामध्ये गॅमा किरणांचा शोध घेण्यासाठी खास `सिंटिलेटर` आधारित सेन्सर्स वापरण्यात आले आहेत.

सध्या या उपग्रहाच्या विविध तांत्रिक चाचण्यांवर काम करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे. यासाठी ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच `इस्रो’सह खासगी प्रक्षेपण कंपन्यांच्या संपर्कात आहेत. या उपग्रहामुळे अवकाशातील रहस्यमय `गॅमा रे बर्स्ट्स’ आणि कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी भारताला नवीन आणि स्वस्त माहिती स्रोत उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ही जगातील पहिलीच अशा प्रकारची संस्था मानली जाते, जी नासा किंवा इस्रोसारख्या मोठय़ा संस्थांप्रमाणेच प्रगत तंत्रज्ञानावर काम करत आहे. विशेषत विकसनशील देशांना स्वस्त दरात अंतराळ डेटा उपलब्ध करून देणे हे त्यांचे मोठे यश मानले जाते.

saryajani@gmail.co

(लेखक संगणक अभियंता आहेत)

Comments are closed.