झारखंड सरकारला विद्यार्थ्यांचा दोन महिन्यांचा अल्टिमेटम

जेपीएससी-जेएसएससी आंदोलन समाप्त : चौकशी न झाल्यास पुन्हा रांचीत जमणार विद्यार्थी

झारखंडमध्ये जेपीएससी-जेएसएससीच्या भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि अनियमिततेच्या विरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर समाप्त झाले आहे. जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म मंचने आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली आहे. तर एक दिवस अगोर देवेंद्रनाथ गटाने देखील स्वत:चे आंदोलन समाप्त केले होते. आता विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. निश्चित कालावधीत निष्पक्ष चौकशी पूर्ण न झाल्यास विद्यार्थी पुन्हा मोठ्या संख्येत रांचीमध्ये पोहोचतील आणि त्यावेळी सीबीआय चौकशी मुख्य मागणी असेल, असे मंचने स्पष्ट केले आहे.

वृत्तसंस्था, रांची

जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म मंचच्या कोर कमिटीच्या बैठकीत आंदोलन सध्या समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने मागण्यांवरुन अनेक मोठी पावले उचलली आहेत, याचमुळे राज्य सरकारला चौकशी पूर्ण करण्यासाठी काही कालावधी दिला जाणार असल्याचे विद्यार्थ्यांचे सांगणे आहे.

राज्य सरकार झुकले

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रभाव पडला असून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेतले आहे. आंदोलनाच्या दबावानंतर सरकारने 22 भरती परीक्षा रद्द केल्या आहेत, तर अनेक इतर परीक्षांची चौकशी सुरू असल्याचा दावा कोर कमिटीच्या सदस्यांनी केला आहे. सरकारने परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांची चौकशी सुरू केली असल्याने निष्पक्ष पद्धतीने चौकशी पूर्ण करण्याची संधी दिली जाणे क्रमप्राप्त असल्याचे विद्यार्थ्यांचे सांगणे आहे.

देवेंद्रनाथ गटाचा निर्णय

जेपीएससी-जेएसएसशी परीक्षा वादावरून वेगवेगळ्या गटांकडून आंदोलन केले जात होते. सोमवारी रात्री देवेंद्रनाथ गटाने स्वत:चे आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली होती. यानंतर मंगळवारी जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म मंचने देखील आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे सध्या रांची येथे भरती परीक्षांवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबले आहे, परंतु सरकारच्या कारवाईवर आमची नजर राहणार असून निश्चित कालावधीत चौकशी पूर्ण न झाल्यास विद्यार्थी पुन्हा रस्त्यांवर उतरतील असे मंचने स्पष्ट केले आहे.

यशस्वी उमेदवार रस्त्यांवर

परीक्षांमधील यशस्वी उमेदवार आता राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यांवर उतरले. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री आंदोलनात सामील विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरी परतण्याचे आवाहन केले होते. बुधवार दुपारपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन स्थळ रिकामी करत स्वत:च्या घरी परत जावे, असे प्रशासनाकडून म्हटले गेले होते. आता विद्यार्थ्यांनी आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यावर धरणे आंदोलन स्थळ रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. आगामी दिवसांमध्ये सरकारकडून होणारी चौकशी आणि कारवाईवरच हे आंदोलन पूर्णपणे समाप्त होते का, दोन महिन्यांनी पुन्हा एकदा रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलनासाठी एकत्र येणार हे स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.