अमेरिकेत निर्णयाचा अभ्यास करत आहे…प्रतिक्रिया पाठवा

विवाहाआधी कुटुंबाला सूचना देणे अनिवार्य ठरणार

वृत्तसंस्था / गांधीनगर

गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांमध्ये व्यापक परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. विवाह नोंदणी आता मातापित्यांना आणि कुटुंबियांना अंधारात ठेवून केली जाऊ शकणार नाही. विवाह नोंदणी करण्यासाठी कोणतेही जोडपे आल्यास त्यांच्या एकमेकांशी विवाह करण्याच्या इच्छेची माहिती त्यांच्या मातापित्यांना आणि कुटुंबाला देण्याचे उत्तरदायित्व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांवर सोपविले जाणार आहे.

त्यामुळे विवाह त्वरित नोंद होणार नाही. विवाह नोंदणी करण्याआधी दोघांच्याही कुटुंबाला सूचना दिली जाईल. ही सूचना विवाह नोंदणीचा अर्ज आल्यापासून 10 कार्यदिवसांमध्ये दिली जाणार आहे. कुटुंबियांचा पोस्टल पत्ता अर्जदारांना द्यावा लागणार आहे. ज्यांना एकमेकांशी विवाह करायचा आहे, त्यांनी त्यांच्या विवाह नोंदणी अर्जासह त्यांच्या मातापित्यांचे आधारकार्ड आणि विवाहाची निमंत्रण पत्रिका सादर करणे अनिवार्य केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे विवाह नोंदणी अधिकारी त्यांच्या मातापित्यांशी संपर्क करुन त्यांना नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला आहे, अशी महिती देतील. तसेच, विवाहेच्छुंनी त्यांच्या मातापित्यांना या विवाहाची सूचना आणि कल्पना दिली आहे, की नाही यासंबंधीचे घोषणापत्र (डिक्लरेशन) सादर करावे लागणार आहे. विवाह नोंदणी अर्जात हा क्लॉज घालण्यात आला आहे. त्यामुळे मातापित्यांना माहिती दिल्याशिवाय विवाह होणार नाही. अशा प्रकारे गुजरातमध्ये आता तत्काळ विवाह नोंदणी बंद केली जाईल.

लोकांच्या मागणीवरुन परिवर्तन

गुजरातमधील अनेक समाजांकडून अशी मागणी आल्याने विवाह नोंदणी नियमावलीत हे परिवर्तन करण्यात येणार आहे. घरातून पळून जाऊन आणि मातापित्यांना कल्पना न देता विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. कन्या किंवा पुत्राने असा विवाह केल्यास मातापित्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच, कन्या किंवा पुत्र कोठे गेली आहेत, याची शोधाशोध करावी लागते, हे त्रास टाळण्यासाठी लोकांच्या आग्रहास्तव हे महत्वाचे परिवर्तन करण्यात येणार आहे, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Comments are closed.