Success Story – कणकवली डामरे मधील युवकाने कलिंगड शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न, बेरोजगार तरुणांसमोर नवा आदर्श
शेती क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या तुटपुंज्या पगारावर समाधानी न राहता कणकवली डामरे मधील स्वप्नील कानडे या युवकाने आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. कलिंगडची शेती करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला आणि घेतलेला निर्णय खरा करून दाखवला. मागील दोन महिन्यात जवळपास दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न त्याने कलिंगडच्या शेतीमधून मिळवलं आहे. त्याच्या या यशस्वी प्रयोगाची सध्या जिल्ह्यात चर्चा असून बेरोजगार युवकांसमोर स्वावलंबनाचा आदर्श त्याने निर्माण केला आहे.
कोरोना आला अन् आयुष्याला कलाटनी
स्वप्नील सुभाष कानडे 2020 साली बी.एस.सी पदवीधर झाला. पदवीप्राप्त केल्यानंतर इतर बेरोजगार युवकांप्रमाणे त्याने नोकरीनिमित्त मुंबई गाठली. मुंबईत खासगी नोकरी करत असताना कोरोनाचा शिर्काव झाला आणि मुंबईतल्या अशा वातावरणामध्ये त्याचं मन रमलं नाही. गावाकडे जाण्याची ओढ त्याला शांत बसू देत नव्हती. त्याने डिसेंबर 2020 मध्ये मुंबईतील नोकरी सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर कणकवली येथील एका कंपनीमध्ये तीन वर्षांच्या करारावर CO या पदावर त्याने कामाला सुरुवात केली. मात्र, फक्त नोकरीवर तो समाधानी राहिला नाही. त्याने नोकरीबोसत जानेवारी 2023 पासून शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यवसाय यशस्वी केला. आजच्या घडीला स्वप्नील शेळीपालन व्यवसायातून दरवर्षी जवळपास एक ते दीड लाखांचे उत्पन्न घेत आहे.
झेंडूंच्या फुलांनी दगा दिला अन् कलिंगडाने सावरलं
नोकरी, शेळीपालन या सर्व गोष्टी सुरू असतानाच स्वत:च्या पडीक एक एकर जागेमध्ये त्याने झेंडू फुलांची लागवड केली. चांगले पीक घेतले मात्र, अती पावसामुळे झेंडू फुलांचे प्रचंड नुकसान झाले आणि त्याला आर्थिक तोटा सहन करावा लागला. म्हणून त्याने मागील वर्षी याच एक एकर जागेपैकी 15 गुंठे जाग्यामध्ये प्रायोगिक तत्वावर बियाणे आणून कलिंगड पिकाची लागवड केली. आपल्याकडे असणारे वातावरण आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नीलला चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे यावर्षी त्याने संपूर्ण एक एकर जागेमध्ये सुमारे 4,500 कलिंगड रोपांची लागवड केली. ट्रॅक्टर नांगरणी, खते आणि ड्रिप इरिगेशनने पाणीपुरवठा यासह पीक काढणीपर्यंत स्वप्नीलला सुमारे 70 ते 80 हजार रुपयांची गुंतवणूक या कलिंगड शेतीसाठी करावी लागली. आंगणेवाडीची जत्रा व कुणकेश्वर जत्रा यांना डोळ्यासमोर ठेवत त्याने उत्तम नियोजन केले. तसेच कलिंगड फळाच्या बाजार विक्री संदर्भातही त्याने चांगला अभ्यास केला. योग्य नियोजन केल्यामुळे कलिंगडाला चांगला दर मिळाला आणि त्याने 60 दिवसांमध्ये सुमारे दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळवलं.
पुढच्या नियोजनाची सुरुवात
आता स्वप्निल कानडे यांची या जागेमध्ये सातत्याने सीजन प्रमाणे पीक घेण्याची मनीषा आहे. पुन्हा फेब्रुवारी अखेरला कलिंगड पिकाची लागवड करून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये पुन्हा कलिंगडाचे चांगले पीक घेण्याचं त्याचं नियोजन आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटक मोठ्या संख्येनो कोकणामध्ये येतात त्या अनुषंगाने कलिंगड पिकाचे त्याचे नियोजन आहे. तसेच पावसाळ्यामध्ये नाचणीचे पीकाचे उत्पन्न घेणार असल्याचेही त्याने सांगितले.
शिक्षणानंतर फक्त नोकरीच्या मागे न धावता पारंपरिक शेतीऐवजी ड्रिप सिंचन व मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे पीक निवडून लागवड केल्यास एखाद्या वर्ग -१ च्या अधिकाऱ्यांप्रमाणे आपली आर्थिक कमाई होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या माध्यमातून काही स्थानिक कामगारांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेती ही तोट्याची नसून योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास शेतीमधून चांगला आर्थिक फायदा तर मिळतोच आणि खूप समाधान मिळते, असा मौलिक संदेश आताच्या बेरोजगार तरुणांना स्वप्नील कानडे यांनी दिला आहे. स्वप्नील च्या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये शेतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे.
Comments are closed.