सर्वात वजनदार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, अभिप्राय पाठवा
इस्रोकडून इतिहास, उपग्रहाचे वजन 6,100 किलो : अवकाशात झेपावलेल्या उपग्रहाचे नाव ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-2’
व्रतसंस्था/श्रीहरिकोटा
भारतीय अवशकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने 6 हजार 100 किलो वजनाच्या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करुन नवा इतिहास निर्माण केला आहे. इस्रोच्या ‘बाहुबली’ अग्नीबाणाच्या साहाय्याने हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी 8 वाजून 55 मिनिटे 30 सेकंदांनी इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आले आहे. या उपग्रहाचे नाव ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-2’ असे आहे. इस्रोने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हा सर्वाधिक वजनाचा आहे. हा उपग्रह दूरसंचार सेवेसाठी असून तो निम्नकक्षेत परिभ्रमण करणारा सर्वात वजनदार उपग्रह आहे.
या उपग्रहाची निर्मिती अमेरिकास्थित ‘एएसटी स्पेसमोबाईल’ या खासगी कंपनीने केली आहे. इस्रोच्या ‘एलव्हीएम 3-एम 6’ या अग्नीबाणाने या उपग्रहाला त्याच्या पूर्वनिर्धारित कक्षेत सुस्थिर केले आहे. याच अग्नीबाणाच्या श्रेणीला ‘बाहुबली’ असे संबोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्वपूर्ण कामगिरीसाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. ‘इस्रो’चे हे यश ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.
90 सेकंदांचा विलंब
पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण बुधवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी केले जाणार होते. तथापि, अवकाशातील परिस्थिती अनुकूल नसल्याने प्रक्षेपण 90 सेकंद विलंबाने करण्यात आले. त्यामुळे ते सकाळी 8 वाजून 55 मिनिटे 30 सेकंदांनी करण्यात आले. अवकाशात उपग्रह प्रक्षेपणाच्या मार्गात ‘अवकाश कचरा’ आढळून आल्याने तो मार्गातून दूर होईपर्यंत प्रक्षेपण लांबविण्यात आले होते. अन्यथा, प्रक्षेपणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. तथापि, योग्य वेळेची प्रतीक्षा केल्याने प्रक्षेपण सुरळीत झाले, अशी माहिती देण्यात आली.
करारानुसार प्रक्षेपण
इस्रोची व्यापारी शाखा ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ आणि अमेरिकेची खासगी उपग्रह निर्मिती कंपनी ‘एएसटी स्पेसमोबाईल’ यांच्यात झालेल्या करारानुसार या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या उपग्रहाचे यशस्वी अवकाशगमन करून इस्रोने आपला पूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी या संस्थेने 4 हजार 400 किलो वजनाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते, असेही स्पष्ट केले गेले आहे.
उपयुक्तता आहे मोठी
या नव्या उपग्रहात अत्यंत आधुनिक अशी दूरसंचार साधने स्थापित करण्यात आली असून त्यामुळे मोबाईलवरून संपर्क साधण्यासाठी भूमीवर मनोरे (टॉवर्स) असण्याची आवश्यकता उरणार नाही. मनोरा विरहित संपर्क यामुळे शक्य होणार आहे. तसेच व्हिडीओ कॉल करण्यासाठीही हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. या उपग्रहामुळे 4 जी आणि 5 जी ध्वनी आणि व्हिडीओ कॉल्स शक्य होणार आहेत.
‘स्पेसमोबाईल’ची योजना
स्पेसमोबाईल या खासगी कंपनीने एक महत्वाकांक्षी योजना सज्ज केली असून या योजनेमुळे मनोराविरहित संपर्क शक्य होणार आहे. ही कंपनी ‘अवकाशाधारित’ (स्पेस बेस्ड) सेल्युलर ब्रॉडबँड नेटवर्कची स्थापना करणार आहे. हे नेटवर्क व्यापारी आणि प्रशासकीय उपयोगासाठी असेल. तसेच ते 4 जी आणि 5 जी कॉल्स, संदेशवहन, स्ट्रीमींग आणि विदासेवा (डाटा सर्व्हिस) यांच्यासाठी उपयुक्त असेल.
पंतप्रधान मोदी यांना आनंद
इस्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे अतिशय आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. तसेच भारताच्या अवकाश क्षेत्रातील कामगिरीतले हे भरीव यश आहे. भारताच्या अवकाश प्रवासातील हा देदिप्यमान क्षण आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
असा आहे उपग्रह…
DW: 6,000 kg kg
D श्रेणी: नेक्स्ट जनरेशन लो ऑर्बिट सॅटेलाइट
ड क्षमता : 4 जी, 5 जी ध्वनी आणि व्हिडीओ कॉल्स
ड आधुनिकता : मनोरा विरहित मोबाईल संपर्क शक्य होणार
असा आहे अग्नीबाण…
ड इस्रोनिर्मित एलव्हीएम 3 ‘बाहुबली’ अग्नीबाणाद्वारे झेप
ड उंची 43.5 मीटर्स जीओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन
ड प्रक्षेपण पद्धती : तीन टप्प्यांमध्ये उपग्रहांचे प्रक्षेपण
ड प्रक्षेपण आधार : इस्रोचे अत्याधुनिक क्रायोजेनिक इंजिन
ड प्रक्षेपण सामग्री : एस 200 घन इंधन, रॉकेट बूस्टर्स
ड बूस्टर्स निर्मिती : विक्रम साराभाई केंद्र, तिरुवनंतपुरम
Comments are closed.