रेल्वेमधून 'अग्नि-प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
रशिया, चीन, उत्तर कोरियानंतर भारत अशी चाचणी करणारा चौथा देश
वृत्तसंस्था/चांदीपूर
भारताने बुधवारी रात्री उशिरा रेल्वे-माउंटेड मोबाईल लाँचर सिस्टम वापरून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टमवरून प्रक्षेपित करण्यात आले. या चाचणीसाठी एक खास डिझाइन केलेली रेल्वे तयार करण्यात आली असून ती रेल्वे लाईनसह देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचण्यास सक्षम आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
ओडिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या चाचणीमुळे भारत रेल्वे नेटवर्कवरून क्षेपणास्त्रs प्रक्षेपित करण्यास सक्षम ‘कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टम’ असलेल्या निवडक देशांच्या गटात समाविष्ट झाला आहे. रशिया, चीन आणि उत्तर कोरियाने यापूर्वी मोबाईल रेल लाँचर्सची चाचणी केली आहे. या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे, परंतु त्यांनी कधीही त्याच्या उपस्थितीची अधिकृत पुष्टी केलेली नसल्यामुळे भारत या यादीत चौथा देश ठरला आहे.
रेल्वेवरून केलेली ही क्षेपणास्त्र चाचणी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण, कोणत्याही युद्धादरम्यान, सैन्याला लाँचिंग पॉइंटपर्यंत जाणाऱ्या रेल्वे लाईनची आवश्यकता असते. काही क्षेपणास्त्रs त्यांच्या वजनामुळे हलवणे कठीण होते. आता ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा संरक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली. या माध्यमातून सैन्य त्यांचे क्षेपणास्त्र शत्रूच्या नजरेपासून वाचवण्यासाठी रेल्वे बोगद्यात लपवूही शकते.
रेल्वेवर आधारित हे मोबाईल लाँचर अंधार आणि धुक्याच्या परिस्थितीतही कमी वेळेत क्षेपणास्त्रs डागू शकते. 70,000 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांसह, भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. दक्षिणेला कन्याकुमारी, उत्तरेला बारामुल्ला, पूर्वेला सैरंग आणि पश्चिमेला ओखा ही देशातील सर्वात दुर्गम रेल्वेस्थानके असून चहुबाजूंना असलेल्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे हे क्षेपणास्त्र परिस्थितीनुरुप कोठेही तैनात केले जाऊ शकते.
‘कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम’ म्हणजे काय?
रेल्वेवरून क्षेपणास्त्र डागण्यासाठी आधुनिक क्षेपणास्त्र लाँचिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये क्षेपणास्त्र एका मजबूत कॅनिस्टरमध्ये (एक मोठा धातूचा कंटेनर) ठेवले जाते. हे कॅनिस्टर क्षेपणास्त्राचे संरक्षण करते आणि ते सहजपणे वाहून नेण्यायोग्य आणि प्रक्षेपणासाठी तयार असते. जास्त तयारी न करता क्षेपणास्त्र थेट कॅनिस्टरमधून डागता येते. हे क्षेपणास्त्र ओलावा, धूळ, हवामान आणि इतर प्रतिकूल परिस्थितींना प्रतिरोधक आहे. ट्रक, रेल्वे किंवा मोबाईल लाँचरवर ठेवून क्षेपणास्त्र वाहून नेले जाऊ शकते. तसेच ते कॅनिस्टरमध्ये बंदिस्त करण्याची सुविधा असल्याने वारंवार देखभालीची आवश्यकताही भासत नाही.
जून 2021 मध्ये सर्वप्रथम चाचणी
अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची रचना 2,000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यासाठी केली असून ते प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. भारताने जून 2021 मध्ये अग्नि मालिकेतील एक प्रगत क्षेपणास्त्र अग्नि-प्राइमची चाचणी केली. ते अण्वस्त्रे देखील वाहून नेण्यास सक्षम आहे. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले असून ते हलके असल्याने मोबाईल लाँचरवरून डागण्यास सक्षम आहे. अग्नि प्राइम क्षेपणास्त्र घन इंधन आधारित असून द्विस्तरीय प्रोपल्शन सिस्टमद्वारे चालवले जाते. त्याची मार्गदर्शन प्रणाली इलेक्ट्रोमेकॅनिकल अॅक्च्युएटरने सुसज्ज आहे. अग्नि प्राइम 4,000 किमीच्या रेंजसह अग्नि-4 आणि 5,000 किमीच्या रेंजसह अग्नि-5 च्या तंत्रज्ञानाने विकसित केले गेले आहे. एकदा डागल्यानंतर लक्ष्य कधीही बदलण्याची क्षमताही त्यामध्ये आहे.
Comments are closed.