असा सनातन धर्माचा प्रभाव आहे
भारतभूमीत निर्माण झालेला ‘सनातन धर्म’ आज जगभरात प्रभावी होत आहे. जगातले सर्व धर्म, जाती, पंथ, विचार आणि समुदाय यांना सामावून घेण्याचे या धर्माचे सामर्थ्य किती आहे, याची प्रचीती एका घटनेवरुन येत आहे. ‘यज्ञ’ हे सनातन धर्माचे एक वैशिष्ट्यापूर्ण प्रतीक आहे. सध्या एक व्हिडीओ प्रसारित होत असून त्यात एक रशियन व्यक्ती वेदोक्त मंत्राचे उच्चारण करत यज्ञ करीत असल्याचे दिसून येत आहे. या रशियन व्यक्तीचे संस्कृत मंत्रांचे उच्चारही अत्यंत स्पष्ट आणि नियमांच्या अनुसार आहेत, असेही या व्हिडीओतून समजत आहे. हा व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय झाला असून त्याला लक्षावधी लाईक्स मिळालेले आहेत.
वास्तविक यज्ञकर्म आज जगात अनेक देशांमध्ये केले जाते. पण ते बहुतेक वेळा त्या त्या देशातील हिंदू धर्मियांच्याकडून केले जाते. आज हिंदूधर्मियांचे, ज्यांना सनातन धर्मिय असेही म्हणतात, त्यांचे वास्तव्य अनेक देशांमध्ये आहे. तेथे ते आपल्या धर्माच्या अनुसार अनुष्ठाने, यज्ञकर्म आणि इतर परंपरांचे कार्यान्वयन करत असतात. ते हिंदूच असल्याने त्यांच्या या कृतीचे विशेष आश्चर्य नाही. तथापि, जेव्हा अन्यधर्मिय व्यक्ती सनातन धर्म आणि त्यात सांगण्यात आलेली यज्ञादी कर्मे यांचे कार्यान्वयन करते, तेव्हा तो चर्चेचा विषय बनणे स्वाभाविकच असते. असेच या व्हिडीओ संबंधात घडताना दिसून येत आहे. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. हा रशियन व्यक्ती ‘नरसिंह यज्ञ’ करताना दिसून येतो. हा व्हिडीओ ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित करण्यात आला आहे. हा व्यक्ती कोण आहे, याचाही शोध अनेक दर्शक घेत आहेत, व्हिडीओवरुन त्याचे नाव स्पष्ट होत नाही. तथापि, त्याची कृती सनातन धर्माच्या प्रभावावर मोठा प्रकाश टाकत आहे, हे निश्चित.
Comments are closed.