उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सुदर्शन रेड्डी

विरोधी आघाडी उमेदवार खर्गे यांच्याकडून घोषित

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपली उमेदवारी सी. पी. राधाकृष्णन यांना दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीनेही तिचा उमेदवार घोषित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे या आघाडीचे उमेदवार असतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही घोषणा मंगळवारी येथे केली आहे.

बी. सुदर्शन रेड्डी हे पुरोगामी न्यायविद आहेत. त्यांना कायदा क्षेत्रात कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सेवा दिली आहे. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे साहसी पायीक म्हणून ओळखले जातात. न्यायाधीश या नात्याने आपल्या निर्णयांमधून त्यांनी गरीब, पददलित आणि शोषितांच्या बाजूने कौल दिला आहे, अशी माहिती खर्गे यांनी दिली आहे.

21 ऑगस्टला अवेदन देणार

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी बी. सुदर्शन रेड्डी 21 ऑगस्टला आपले आवेदनपत्र सादर करणार आहेत. त्यावेळी विरोधी पक्षांचे सर्व खासदार संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थित राहून त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत. त्यांच्या नावाला सर्व विरोधी पक्षांनी संमती दिली आहे. आम्ही भारतीय जनता पक्षासमवेत एक वैचारिक संघर्ष करीत आहोत. त्याच नात्याने आम्ही बी. सुदर्शन यांना उमेदवारी दिली आहे, असेही प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

अंतर्भूत

माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 ऑगस्ट 1946 या दिवशी सध्याच्या तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील अकुला मिलाराम या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. 1971 मध्ये त्यांनी तत्कालीन आंध्र प्रदेशातील उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि ते आंध्र प्रदेश वकील संघटनेचे सदस्य झाले. दोन वर्षे सरकारी वकील म्हणून काम केल्यानंतर ते न्यायाधीश झाले. 1995 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश झाले. 2005 मध्ये ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 2007 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायादीश झाले. त्यानंतर 2011 मध्ये ते निवृत्त झाले. 2013 मध्ये त्यांची गोव्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांनी व्यक्तीगत कारणास्तव हे पद सोडले होते.

Comments are closed.