दिल्लीच्या मुख्यमंत्रींवर अचानक हल्ला
निवासस्थानी कार्यक्रमात केली मारहाण, हल्लेखोर गुजरातचा, त्वरित अटक, घटनेमुळे सर्वत्र खळबळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या अधिकृत निवासस्थानातच हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘जन सुनवाई’ या कार्यक्रमाचे आयोजन त्या आपल्या निवासस्थानी करतात. याच कार्यक्रमात बुधवारी त्यांच्यावर राजेशभाई खिमजीभाई साकरिया नामक हल्लेखोराने हा हल्ला केला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना मारहाणही केली. या मारहाणीत त्या काहीशा जखमी झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
हल्लेखोराला त्वरित ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. हल्लेखोर मुख्यमंत्र्यांच्या ‘जन सुनवाई’ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आला होता. त्याने प्रथम मुख्यमंत्र्यांच्या हाती एक कागद दिला. नंतर, अचानक त्यांच्या जवळ जाऊन त्यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. त्याने त्यांच्या डोक्यावरचे केसही धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्वरित त्यांच्या निवासस्थानी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला घेरत ताब्यात घेतले.
जड वस्तू फेकण्याचा प्रयत्न
हल्लेखोराने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या दिशेने एक जड वस्तू फेकली. ती त्यांना लागल्याने त्या खाली पडल्या अशी माहिती नंतर दिल्ली पोलिसांनी दिली. ही वस्तू मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले, असा घटनाक्रम भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केला आहे.
80 सेकंदांचा थरार
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी 11 वाजता ‘जन सुनवाई’ या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर 10 मिनिटांमध्येच हल्लेखोराने पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांना कागद दिला आणि एकदम त्यांच्या डोक्यावरचे केस ओढून त्यांना खाली पडण्याचा प्रयत्न केला. त्याने एक जड वस्तू त्यांच्यावर भिरकाविली. त्या वस्तूच्या दणक्याने त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. त्याआधी हल्लेखोराने त्यांना थप्पड लगावली त्यानंतर तो पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. हल्ल्याचे कारण शोधले जात आहे.
हल्लेखोर कोण, कुठचा…
राजेशभाई साकरिया हा 41 वर्षांचा असून मूळचा गुजरातमधील आहे. तो श्वानप्रेमी असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. तो बौद्धिकदृष्ट्या अधू असल्याचेही त्याच्या आईने प्रतिपादन केले. त्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रवेश केला होता. त्याचा एक नातेवाईक तिहार कारागृहात आहे. त्याच्या प्रकरणाच्या संदर्भातील कागदपत्रे त्यांने त्याच्या समवेत नेली होती. तेच कागद मुख्यमंत्र्यांना दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला होता.
चर्चा करायची होती
दिल्लीतील भटक्या किंवा मोकाट कुत्र्यांच्या विषयावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी चर्चा करायची होती, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर गेल्या 24 तासांपासून लक्ष ठेवले होते. त्याला संधी मिळताच त्याने या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचा आभास निर्माण करून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळविला. मुख्यमंत्र्यांवरील हल्ला पूर्वनियोजित आहे काय, याचा तपास होत आहे. तसेच त्याचे दहशतवादी गटांशी किंवा माओवादी गटांशी संबंध आहेत काय, याची पडताळणी केली जात आहे.
हल्लेखोर मनोरुग्ण?
हल्लेखोर राजेशभाई साकरिया हा मनोरुग्ण आहे, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. तो श्वान आणि प्राणीप्रेमी आहे. त्याने आजवर घरातील इतर कुटुंबियांनाही अनेकदा मारहाण केली होती. त्याच्या एका नातेवाईला कारागृहातून सोडविण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठीच तो दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तथापि, त्याने अकस्मातपणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचे कारण काय, हा प्रश्न निर्माण झाला असून त्याच्या कृतीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेने दिल्ली आणि साऱ्या देशातही मोठी खळबळ उडाली आहे.
देशभरात चर्चेचा विषय…
ड विद्यमान मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे हल्ला होण्याचा हा प्रथमच प्रसंग
ड हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचा दावा, मात्र सर्वंकष चौकशीचा आदेश
ड मुख्यमंत्री निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली कडक
Comments are closed.