Sudhakar badgujar has entered and a BJP leader who opposed him has been badly beaten in marathi
Nitesh Rane : मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दोन दिवसांनंतर शिवसेना ठाकरे पक्षाने बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली होती. पक्षाकडून झालेल्या कारवाईमुळे सुधाकर बडगुजर नाराज झाले. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला. तरीही आज मंगळवार, 17 जून रोजी सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बडगुजर यांचा प्रवेश झाला आणि त्यांना विरोध करणारा भाजपाचा एक नेता चांगलाच तोंडघशी पडला आहे. (sudhakar badgujar has entered and a BJP leader who opposed him has been badly beaten)
भाजपा आमदार तसेच मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गेल्या अधिवेशनात थेट विधानसभेत बडगुजर यांच्यावर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. साधारणपणे दीड वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेत केला होता. राणे यांची तेव्हाची भूमिका आणि आजची बदललेली भूमिका यावरून चांगल्याच राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
नितेश राणे यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या सलीम कुत्ता या दोघांचे फोटो विधानसभेत दाखवले होते. बडगुजर यांना कोणाचा वरदहस्त आहे, हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून त्यांना कसे संरक्षण दिले जाते, असे सांगत त्यांनी ठाकरे गटावर शरसंधान केले होते. यानंतर तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : प्रवेश घेतलात, आता मतभेद दूर करा; बडगुजर पक्षात येताच बावनकुळेंचे आवाहन
मात्र, सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश होण्यावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्याची भाषा 180 अंशांच्या कोनात बदललेली आहे. आक्रमकपणे विरोधकांचे लचके तोडणाऱ्या नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले आहे. मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना, हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार, असे राणे यांनी सांगितले. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू आहे. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.
मात्र, नितेश राणे आज जरी असं म्हणत असले तरी अत्यंत आक्रमकपणे बडगुजर यांच्यावर आरोप करणाऱ्या नितेश राणे पक्षाच्या बदललेल्या भूमिकेमुळे तोंडघशी पडलेले दिसत आहेत. यापूर्वी देखील भाजपाचा एक नेता असाच पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे तोंडघशी पडला होता.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केलेले बहुसंख्य नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपबरोबर आल्याने सोमय्या यांची पंचाईत झाली. किरीट सोमय्या यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, नारायण राणे, कृपाशंकर सिंह, रवींद्र वायकर आदी नेत्यांविरोधात गैरव्यवहाराची विविध प्रकरणे काढत त्यांच्याविरोधात अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती.
मात्र, त्यानंतर यातील काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर काही नेते भाजपासोबत आले. त्यामुळे ही सगळी प्रकरणे थंड झाली. पण, यामुळे या सर्वांविरोधात आघाडी उघडलेल्या किरीट सोमय्यांची मात्र पंचाईत झाली. शेवटी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सोमय्या यांना मला पक्षाने जे करायला सांगितले ते मी केले, असे जाहीर करावे लागले. तशीच काहीशी परिस्थिती आता नितेश राणे यांची होणार आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Comments are closed.