पर्मनंट कुणीही नाही, मुख्यमंत्रीपद शाश्वत नसते, मंत्रीपद कायम नसते!मुनगंटीवार यांचा फडणवीस आणि बावनकुळे यांना टोला

मला मंत्रीपद नाकारण्यात आले त्याची नाराजी माझ्यात नव्हे, तर येथील जनतेत आहे. मंत्रीपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही येणार आणि जाणारही आहे. पर्मनंट कुणीही नाही. मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रीपद, काहीच शाश्वत नसते, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिह्यातील पक्षांतर्गत राजकारणावरून मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना लगावला.

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत चंद्रपूर जिह्यात झालेल्या भाजपच्या पराभवावरून मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. पक्षांतर्गत राजकारणावरून राज्यातील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही, असे खडे बोल त्यांनी संबंधितांना सुनावले आहेत. त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मुनगंटीवार यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.

z मंत्रीपद हा विषय नाही. जेव्हा पक्षाचा विस्तार व्हायचा होता, सत्ताही यायची होती, तेव्हाही भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिह्यांनी भाजपाच्या पाठीशी मतरूपी आशीर्वाद उभा केला होता. कार्यकर्त्यांच्या मनात एक भावना आहे की, इतके वर्षे कष्ट, मेहनत केल्यावर या चार जिह्यांच्या नशिबात जो विकास पाहिजे, तो वेगाने व्हावा. ही इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. या अशा वातावरणाचा परिणाम निश्चितपणे जिह्यातील निवडणूक निकालांवर झाल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

मला ताकदीची गरज नाही

मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी अनेक कामे करतो आणि केलेली आहेत, असा पलटवार मुनगंटीवार यांनी पालिका निवडणुकीत ताकद देऊ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर केला. महापालिका निवडणुकीनंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शोभाताई फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटल्या

चंद्रपूर जिह्यात निवडणुकीत भाजपची पिछेहाट झालेली असतानाच शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरात रामगिरी निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली.

बावनकुळेंना करून दिली पडत्या काळाची आठवण

मंत्रीपद नसण्याचा व पराभवाचा थेट संबंध नसतो या बावनकुळे यांच्या विधानाचा मुनगंटीवार यांनी समाचार घेतला. बावनकुळे साहेबांना आता असे वाटणे साहजिक आहे; पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते, असे सांगत बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाची आठवण करून दिली.

मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्ते जे भूमिका पोहोचवतात ते सांगण्याची जबाबदारी मी पार पाडतो!

Comments are closed.