ट्रॅक्टरचे टायर फोडले, सोलापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन पेटले

ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळाला या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने वाखरी पालखी तळावर आमरण उपोषण सुरु आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर फोडून ऊस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऊस दर सरकारने जाहीर करावा अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर महिला आंदोलन करतील, असा इशारा आंदोलकांच्या पत्नींनी दिला आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलन चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे.
तिसऱ्या दिवशी खर्डी येथील सीताराम कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. तर शुक्रवार दि. 12 रोज चौथ्या दिवशी श्रीपूर येथील पांडूरंग कारखान्यावर गव्हाणीत उतरत आंदोलन करण्यात आले. सुमारे पाच तास कारखान्याचे गाळप बंद पाडले. तर सकाळी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आंदोलनाची चांगलीच धास्त घेतली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी समाधान फाटे व इतर तीन आंदोलकांची तब्येत बिघडत चालली असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनस्थळी भेट देत टाहो फोडला. समाधान फाटे यांच्या मुलीने सरकारला विनंती केली आहे की, लवकरात लवकर ऊस दराचा तोडगा काढा आणि माझ्या वडिलांना वाचवा. असे आवाहन केले आहे.
तर कारखानदारांच्या घरासमोर महिला आंदोलन करतील…
शेतकरी नेते संग्राम गायकवाड यांच्या पत्नी सुनिता गायकवाड यांनी ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, गायीच्या दुधाला 50 तर म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर द्यावा, अशी मागणी आंदोलकांची आहे. या मागणीसाठी गेले पाच दिवस आंदोलन सुरु आहे. त्यामुळे ऊस दरावर केंद्र व राज्य सरकारने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. जर का तोडगा काढला नाहीत तर शनिवारपासून महिलांना बरोबर घेवून साखर कारखानदारांच्या दारात उभा राहून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Comments are closed.