शेतकऱ्यांनी गव्हाणीत उड्या मारताच ऊसदर जाहीर

शेतकऱ्यांनी केन हॉपरमध्ये उडी घेतल्यानंतर लगेचच उसाचे भाव जाहीर केले

उसाला 3500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने वाखरी पालखीतळ येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. खर्डी येथील श्री सीताराम महाराज कारखान्याने अद्यापि ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आज दुपारी शेतकऱयांनी गव्हाणीत उडय़ा घेत गाळप बंद पाडले. अखेर कारखान्याने पहिले बिल 3 हजार रुपये जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आज वाखरी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले, तर दुपारनंतर खर्डी (ता. पंढरपूर) येथील श्री सीताराम महाराज साखर कारखान्यावर जाऊन आंदोलकांनी गव्हाणीत उडय़ा मारून ऊसगाळप बंद पाडले. जोपर्यंत ऊसदर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने कारखाना प्रशासनाने नमती भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड यांनी पहिले बिल तीन हजार रुपये जाहीर केले. ऊसदर जाहीर केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतल्याने सीताराम कारखान्याचे गाळप पुन्हा सुरळीत सुरू झाले.

उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळालाच पाहिजे. ऊस कोणत्याही वजनकाटय़ावर वजन करून आणण्याची घोषणा सर्व कारखान्यांनी करावी, गाईच्या दुधाला 50 रुपये व म्हशीच्या दुधाला 80 रुपये प्रतिलिटर दर मिळावा, शेतकऱयांची सरसकट कर्जमुक्ती करावी, दोन साखर कारखान्यांमधील 25 कि.मी.ची हवाई अट रद्द करावी, या मागण्यांसाठी शेतकरी नेते समाधान फाटे हे सहकाऱयांसमवेत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागली आहे. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी ‘रास्ता रोको’ करत कारखान्यांचे गाळप बंद पाडू लागले आहेत.

या आंदोलनावेळी शेतकरी नेते सचिन पाटील, दीपक भोसले, माउली जवळेकर, ऍड. दीपक पवार, संग्राम गायकवाड, निवास नागणे यांच्यासह आंदोलक व शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed.