संसद भवनाजवळ आत्महत्येचा प्रयत्न

पेटवून घेतले : गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील संसद भवनासमोर एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत आग विझवत संबंधित व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात हलविले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला आहे. घटनास्थळी अर्धवट जळालेली पिशवी, पेट्रोल आणि बूटही सापडले. तरुणाने ज्या ठिकाणी स्वत:ला पेटवून घेतले त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असून त्याचे नाव जितेंद्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने स्वत:ला का पेटवून घेतले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून दोन पानांची अर्धी जळालेली नोट सापडली आहे. जळत असलेल्या व्यक्तीला घटनेनंतर लगेच ब्लँकेटने झाकण्यात आले.

डिसेंबर 2023 मध्ये संसदेत घुसण्याची घटना

13 डिसेंबर 2023 रोजी संसद भवनात घुसखोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मनोरंजन डी, नीलम आझाद, सागर शर्मा, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत यांना अटक करण्यात आली होती. नीलम आणि तिचे 5 सहकारी आता युएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्यांतर्गत तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

हिवाळी अधिवेशनाची नुकतीच सांगता

गेल्या आठवड्यात वाद आणि राजकीय मतभेदांदरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी दोन महत्त्वाची विधेयके मांडण्यात आली. तथापि, बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या कथित टिप्पण्यांवरून राजकीय वादामुळे कार्यवाही विस्कळीत झाली.

Comments are closed.