सुजल खोतने रिझवी स्पोर्ट्स क्लबला सावरले, एमसीए 29 वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

एमसीए 29 व्या अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सुजल खोतच्या (143 चेंडूंत 80 धावा) दमदार अर्धशतकाच्या जोरावर रिझवी स्पोर्ट्स क्लबने इस्लाम जिमखाना संघाविरुद्ध दोन दिवसीय उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी 93 षटकांत 6 बाद 183 धावा केल्या.
वरळी स्पोर्ट्स क्लब येथे सुरू असलेल्या सामन्यात इस्लाम जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रिझवी स्पोर्ट्स क्लबने सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्या तरी सुजलने वर्षीत कान्हुरकरसह तिसऱ्या विकेटसाठी 143 मिनिटांत 278 चेंडूत 119 धावांची भागीदारी करताना संघाला सुस्थितीत आणले.
सुजलने 143 चेंडूंत 80 धावा काढताना 8 चौकार मारले. वर्षीतने 267 चेंडूंत 49 धावांची संयमी खेळी केली. त्यात एका चौकाराचा समावेश आहे. इस्लाम जिमखान्याकडून प्रीत निजाई (2/28) आणि मोहित चौधरीने (3/30) प्रभावी गोलंदाजी केली.

Comments are closed.