सुनेत्रा पवारांची माळेगाव कारखान्याला भेट; अजित पवारांच्या जागी होणाऱ्या चेअरमनपदाची निवड ढकलली

बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आज चेअरमन पदाची निवड होणार होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्याने ही निवड पुढे ढकलण्यात आलेले आहे. सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी नियुक्ती होणार आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या ब वर्ग गटातून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. याआधी अजित पवार ब वर्ग गटातून निवडून आले होते आणि त्यांची नियुक्ती कारखान्याच्या चेअरमनपदी करण्यात आली होती. अजित पवारांच्या (Ajit Pawar) जाण्याने चेअरमन पद रिक्त झालं होतं.

सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, गेली काही वर्ष दादांची सकाळ कारखान्याचे एमडीला फोन करण्यापासून व्हायची. अनेक कारखान्यांना मी पण अधून मधून भेट देत होते. मला कारखान्याबाबत सखोल माहीत नसली तरी माझी तोंड ओळख आहे. त्यामुळे काम करताना जरी अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांमुळे अशक्य होणार नाही. माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या ना आवडणाऱ्या गोष्टी घडणार नाही त्याची मी काळजी घेईल. कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझं लक्ष असेल असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी काही दिवसापूर्वी स्वप्निलला म्हणाले होते, मला तुम्ही माळेगावला कधीही बोलावलं नाही, पण मी येणार आहे, तुमच्याकडे, पण अशा पद्धतीने मला तिथे यावं लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, आदरणीय दादांचा माळेगाव कारखाना देशामध्ये अग्रगण्य कारखाना व्हावा असं स्वप्न होतं, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निलकंठेश्वर पॅनलला जेव्हा सगळ्यांनी भरभरून मतदान दिलं, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि चांगल्या कामामुळे दादांची निष्ठा आणि त्यांचं सगळ्यांवर असणार बारीक लक्ष यामुळे आपण सगळ्या कारखान्यावर आल्यानंतर दादा उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांनी या कारखान्याची जबाबदारी घेतली. त्यामध्ये एकच कारण होतं की हा कारखाना त्यांना देशामध्ये एक नंबरचा बनवायचा होता, त्यामागे ते खूप काम करत होते, चेअरमन झाल्यावर सुद्धा अल्पावधीतच खूप काही गोष्टी त्यांनी कारखान्यासाठी केल्या, दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत, कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आपण सगळेच शेतकरी या सगळ्यांच्या भल्यासाठी दादांनी जे जे ठरवलं आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करेन असं आश्वासन देखील सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे.

अजितदादांच्या पावलावर पाऊल; पार्थ व जय पवारांची बारामतीतील विकासकामांची पाहणी

अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी पहाटेच्या सुमारास विकासकामांची पाहणी केली.आज पहाटे पार्थ पवार व जय पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली.यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत कोणतीही ढिलाई न करता कामे बारकाईने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.विकास कामांची पाहणी करून पार्थ आणि जय पवार सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झाले.

आणखी वाचा

Comments are closed.