विराट-रोहित कम बॅक करतील

हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ‘ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात जोरदार पुनरागमन करतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्थमधील पहिल्या सामन्यात दोघांच्याही निराशाजनक खेळीनंतर गावसकर यांनी सांगितले की, ‘विराट आणि रोहित यांचा फक्त वेळ आणि सरावाचा प्रश्न आहे. दोघेही अनुभवी फलंदाज असून, लवकरच आपल्या लयीत परततील. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात कोहली शून्यावर आणि रोहित केवळ आठ धावांवर बाद झाले. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतताना त्यांना पर्थच्या वेगवान आणि उसळी असलेल्या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला. हिंदुस्थानचा डाव कोसळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

गावसकर यांनी विराट व रोहित यांचे समर्थन करताना सांगितले, ‘ते ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक उसळी असलेल्या विकेटवर खेळत होते. इतक्या दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या खेळाडूंसाठी ती परिस्थिती सोपी नव्हती. नियमित खेळणाऱ्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरलादेखील अडचण झाली होती. मात्र, टीम इंडिया अजूनही अत्यंत सक्षम संघ आहे. पुढच्या दोन सामन्यांत रोहित आणि कोहली मोठी खेळी करतील यात आश्चर्य वाटू नये. जितका वेळ ते सरावात आणि मैदानावर घालवतील, तितक्या लवकर ते लयीत येतील. एकदा ते धावांच्या लयीत आले की, हिंदुस्थानचा धावफलक 300 किंवा त्याहून अधिक असेल.’

Comments are closed.