पॅडीला संधी देऊ न शकल्याची खंत, सुनील गावसकरांनी व्यक्त केली भावना

मुंबई क्रिकेटसाठी वयाच्या पन्नाशीपर्यंत फिरकी मारा करूनही हिंदुस्थानी क्रिकेट संघात स्थान मिळवू न शकलेल्या पॅडी अर्थातच पद्माकर शिवलकरांच्या अतृप्त क्रिकेट कारकिर्दीला हिंदुस्थानातील क्रिकेट दिग्गजांनी मुंबईने विजयाचा शिल्पकार गमावल्याची भावना व्यक्त केली. तसेच मी कर्णधार असूनही पॅडीला संधी देऊ न शकल्याची मला खंत असल्याची भावना महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पॅडी यांच्या निधनाबद्दल तीव्र शब्दांत शोक व्यक्त केला. ते म्हणाले, मुंबई क्रिकेटने अल्पावधीतच मिलिंद रेगे आणि आता पद्माकर शिवलकर हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार गमावले. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार म्हणून मला खंत आहे की, कसोटी संघात पॅडीला संधी देण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीला मी पटवू शकलो नाही. तो हिंदुस्थानची कॅप मिळवण्यासाठी इतरांपेक्षा अधिक पात्र होता, पण नशिबाची साथ लाभली नाही. त्याची शैली अशी अफलातून होती की, तो दिवसभर गोलंदाजी करायचा. तो हिंदुस्थानच्या सर्वोत्तम डावखुऱया फिरकीवीरांपैकी एक होता.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनेही पॅडींना आदरांजली वाहिली. हिंदुस्थानने एक महान डावखुरा फिरकीवीर गमावला. प्रचंड प्रथम श्रेणी क्रिकेट खेळूनही त्यांना अनपेक्षितपणे हिंदुस्थानी संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नसल्याचे त्यांच्याबद्दल अनेकदा ऐकले होते. अशा एका आवडत्या गोलंदाजाला भावपूर्ण श्रद्धांजली!

तसेच हिंदुस्थानी क्रिकेट विश्वातला एक सर्वोत्तम फिरकीवीर काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी क्रिकेटला खूप मोठे योगदान दिल्याची श्रद्धांजली बीसीसीआयने वाहिली. मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आपल्या शोकसंदेशात, पद्माकर शिवलकर यांचे मुंबई क्रिकेटमधील योगदान अतुलनीय होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली.

Comments are closed.