IPL 2026 – हिंदुस्थानी पाहुणचाराचा गैरफायदा घेऊ नका; आयपीएलमध्ये उशिरा येणाऱ्या परदेशी खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 2026 च्या हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी परदेशी खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक परदेशी स्टार खेळाडू उशिरा दाखल होतात किंवा वैयक्तिक कारणांचे निमित्त साधून स्पर्धेतून माघार घेतात, या प्रवृत्तीवर गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परदेशी खेळाडू हिंदुस्थानच्या आदरातिथ्याचा आणि इथल्या व्यवस्थेचा चुकीचा फायदा घेत असल्याचे म्हटले आहे.
सुनील गावस्कर यांच्या मते, आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग असून भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि फ्रेंचायझी या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात मानधन देतात. मात्र काही खेळाडू या उदारतेला आपला हक्क समजून त्याचा गैरफायदा घेतात. बीसीसीआय आणि फ्रँचायझी खेळाडूंना भरघोस मानधन देतात, तरीही आंतरराष्ट्रीय वेळापत्रक किंवा विश्रांतीचे कारण देऊन सुरुवातीच्या महत्त्वाच्या सामन्यांना मुकणे हे व्यावसायिकतेच्या विरुद्ध आहे. जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांसारखे मोठे खेळाडू तंदुरुस्तीच्या कारणास्तव हंगामाच्या उत्तरार्धात सामील होण्याची शक्यता असल्याने गावस्कर यांनी फ्रँचायझींना अशा खेळाडूंबाबत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
जे खेळाडू कराराचा सन्मान करत नाहीत किंवा ऐनवेळी माघार घेतात, त्यांना संघातून थेट वगळले पाहिजे, असे स्पष्टच मत गावस्कर यांनी मांडले आहे. खेळाडूंच्या अशा वागण्यामुळे संघाच्या नियोजित धोरणांना आणि विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसतो. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटची प्रतिष्ठा आणि आयपीएलची विश्वासार्हता टिकवण्यासाठी खेळाडूंनी व्यावसायिक वृत्ती दाखवणे आवश्यक असून, वेळेवर उपलब्ध न होणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात कपात करण्यासारखी पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सुचवले आहे.
Comments are closed.