वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीमागे सुनील गावस्कर यांचे मार्गदर्शन; स्वतःच सांगितलं त्यामागचे कारण

अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचं आपल्या फटकेबाजीने लक्ष वेधलं. त्याने वय हा केवळ आकडा असल्याचं सिद्ध करत आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. बिहारमध्ये जन्मलेल्या या युवा फलंदाजाने १६ सामन्यांत तब्बल ७७६ धावा करत राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या क्वालिफायरपर्यंत नेण्यात मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वैभवने यंदाच्या मोसमात अनेक अवॉर्ड्स आपल्या नावे केले. यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याने सुनील गावस्करांबद्दल एक खुलासा केला.

अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान बोलताना वैभवने आपल्या बालपणीची एक खास आठवण सांगितली. त्याने सांगितलं की, त्याचे वडील त्याला गावसकरांच्या गोष्टी त्याला सांगायचे, विशेषतः त्यांनी हेल्मेट न घालता वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना कसा केला याबद्दल त्यांनी अनेकदा सांगितलं.

वैभव सुनील गावस्करांच्या गोष्टी ऐकण्याच्या आठवणीबद्दल सांगताना म्हणाला, “या हंगामातून मी खूप काही शिकलो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही अनेक गोष्टी अनुभवल्या. मला अजून खूप मेहनत घ्यायची आहे. दीर्घकाळ क्रिकेट खेळायचं असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यावर मी लक्ष देणार आहे.”

“मी माझ्या मोबाईलमध्ये काही नोंदी करून ठेवल्या होत्या. या आयपीएलमध्ये ७०० धावा करण्याचं लक्ष्य मी लिहून ठेवलं होतं. प्रत्येक सामन्यानंतर कोणत्या संघाविरुद्ध किती धावा केल्या, याचीही नोंद करत होतो,” असं वैभवने सांगितलं.

गावसकरांच्या शेजारी उभा राहून वैभवने त्यांच्यासंबंधित बालपणीच्या आठवणी सांगत म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं आहे. आमच्या घराजवळ वडिलांनी सिमेंटची खेळपट्टी तयार केली होती. मी तिथे सराव करायचो आणि ते नेहमी जाळीमागे उभे असायचे. लहानपणी माझी उंचीही खूप कमी होती. मी एखादा चांगला फटका मारला की गोलंदाज मला बाऊन्सर टाकायचे.”

“बाऊन्सरमुळे मी कधी-कधी वैतागायचो. तेव्हा बाबा तुमच्या गोष्टी सांगायचे. ते म्हणायचे, ‘आमच्या काळात एक दिग्गज फलंदाज होता. तो हेल्मेट न घालता वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजांचे बाऊन्सर षटकारासाठी खेचायचा.’ त्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा मिळाली. ते नेहमी तुमच्याबद्दल बोलत असायचे,” असं वैभवने सांगतिलं. यासह वैभव सूर्यवंशीने सुनील गावस्करांची प्रेरणी घेत आपली फलंदाजी मजबूत केली.

विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाजांविरुद्ध वैभवची निर्भय फलंदाजी सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावत कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वेगवान गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला होता.

Comments are closed.