संजय गांधी निराधार योजनेत साडेतीन हजार रुपये द्या! सुनील प्रभू यांची मागणी
संजय गांधी निराधार योजनेमध्ये सध्या 2100 रुपये दिले जातात. सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. इतर योजनांमध्ये सरकार पैसे देत आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेत किमान साडेतीन हजार रुपये द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना सुनील प्रभू यांनी ही मागणी केली. त्याशिवाय त्यांनी पाणी पुरवठा, रस्ते, झोपडपट्टय़ांमधील पहिल्या मजल्यावरील घरांचा पुनर्विकास अशा विविध विषयांवर भाष्य केले. उपनगरातील झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासात खूप मोठी अडचण येते. या झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावरील रहिवाशांकडे लाईट बिले आहेत. मतदारयादीत नाव आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत. पण पुनर्विकासात अडचणी येतात. त्यासाठी मंत्र्यांकडे बैठक लावून कायद्यामध्ये विशेष बदल करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचा फायदा इतर भागातील अनेकांना होईल.
वाघेश्वरी मंदिर तीर्थक्षेत्र
या वेळी सुनील प्रभू यांनी त्यांच्या मतदारसंघातील वाघेश्वरी मंदिराला तीर्थत्रेत्राचा दर्जा देण्याची मागणी केली. या मंदिरामध्ये संपूर्ण मुंबईतून भक्त येतात. काही लोकांची ही कुलस्वामिनी आहे. वाघेश्वरी मंदिराचा तीर्थक्षेत्र आराखडय़ात समावेश केल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि भाविकांना सुविधा मिळतील.
नवीन जलवाहिनीचे काम ठप्प
दिंडोशी मतदारसंघातील उंचावर वसलेल्या महापलिका वसाहतीमधील 450 मि.मी. व्यासाची जलवाहिनी बदलून पोलादी 900 मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण काम सुरू झालेले नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
प्रकल्पग्रस्तांना घरे
कुरार व्हिलेजमध्ये नाला रुंदीकरणातील प्रकल्पग्रस्तांना त्याच भागात घरे देण्याची मागणी त्यांनी केली. 189 पीटीसी महापालिकेला हस्तांतरीत करण्याची मागणीही त्यांनी केली.
Comments are closed.