मुंबईची तहान भागवण्यासाठी सरकारने 500 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने द्यावे, सुनील प्रभू यांची मागणी
मार्च महिन्यातच मुंबईत पाण्याची समस्या सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राज्याच्या सिंचन विभागाकडून 500 दशलक्ष लिटर्स (एमएलडी) अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेला 500 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू म्हणाले की, मुंबईत चार हजार दशलक्ष लिटर पाणी धरणातून आणतो. पण माझ्या मतदारसंघात आप्पा पाडा, क्रांती नगर, दत्तवाडी, तानाजी नगर, संतोष वाडी, नागरी निवारा, कोकणीपाडा भागात पाण्याची समस्या आहे. लोकप्रतिनिधी पालिकेच्या जलअभियंत्यांना फोन करतात. पण जलअभियंतेही हतबल असतात. आज नगरसेवक नाहीत. आमदारांना लोकांच्या शिव्या खायला लागतात. मुंबईतील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठवून अप्पर वैतरणा धरणातून 68 हजार दशलक्ष लिटर पाणी, भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर पाणी अतिरिक्त मागितले आहे. त्याचे पत्र सरकारकडे गेले आहे. राज्याच्या सिंचन विभागाने मुंबई महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी तत्काळ द्यावे, अशी मागणी केली.
पालिका रुग्णालयात डॉक्टर नाहीत
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर नाहीत. आयसीयू बंद आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स नाहीत. गोळ्या, औषधे नाहीत. दिंडोशी विभागातील आप्पा पाडामध्ये सुपरस्पेशालिटी आरोग्य केंद्र तयार केले. पण त्या ठिकाणी डॉक्टर्स, औषधे नाहीत. नागरिकांचे हाल होत आहेत.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील घरे
दिंडोशी मतदारसंघात रस्ते व नाले रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या भागातील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील 269 चौरस फुटांची घरे बिल्डरांना भाडय़ाने देण्यासाठी जाहिरात काढली आहे. पण ही घरे भाडय़ाने न देता या विभागातील प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केली.
लक्ष्मी आनंदी झाल्यावर घरे वर्ण
प्रकल्पग्रस्तांना घरे देताना वास्तव्याचे पुरावे असले तरी अपात्र केले जाते. अपात्र केल्यावर सुनावणीमध्ये पात्र होतात ही जादू कशी होते… म्हणजे ‘लक्ष्मी प्रसन्न’ होते मग तो पात्र होतो ही परिस्थिती आहे.
Comments are closed.