खराब रस्ते…बंद पथदिवे…श्वानांचा सुळसुळाट, शिवधाम संकुलातील नागरी समस्या दूर करा! शिवसेनेची महापालिकेकडे मागणी
दिंडोशी शिवधाम संकुलातील खराब रस्ते, बंद पडलेले पथदिवे, श्वानांचा सुळसुळाट अशा विविध समस्यांचा आढावा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला. नागरिकांच्या गैरसोयी तत्काळ दूर करा, अशी मागणी यावेळी पालिकेकडे करण्यात आली.
शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी रहिवाशांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शिवधाम संकुलातील खराब रस्ते, बंदावस्थेतील पथदिवे, मलनिस्सारण वाहिनी, रस्त्याचे काँक्रीटीकरण, भटक्या श्वानांचा होणारा त्रास तसेच फायर ब्रिगेडच्या मागील कबूतरखाना बंद करण्यात यावा अशा समस्या रहिवाशांनी मांडल्या. या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. सुभाष धनुका, शैलेश जाधव, अशोक दैने, आर्यन जाधव, मंगेश चव्हाण, शिवधाम सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बोभाटे, जितेंद्र पराडकर, विविध गृहनिर्माण सोसायटय़ांचे पदाधिकारी संतोष नाझरे, रामचंद्र म्हापणकर, अरुण वाघ, कुंदन गोस्वामी, सुरेश गोसावी, अनंत ठाकरे, सुनील मोरे, प्रथमेश वेंगुर्लेकर उपस्थित होते.
ओबेरॉय मॉलसमोरील बॅरिकेड्स हटवा
अभिषेक सोसायटी ते वृंदावन-प्रयाग सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करा, येथील पथदिवे बंद असून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत दोन मोठे हॅलोजन लावा, अशा सूचना त्यांनी पालिकेचे कार्यकारी अभियंता रोहन खरात व सेंट्रल रोडचे सब इंजिनीयर चेतन सावंत यांना दिल्या. ओबेरॉय मॉलसमोरील बॅरिकेड्समुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवत रस्ता क्रॉस करावा लागतो. त्यामुळे बॅरिकेड्स काढून नागरिकांना सुरळीत रस्ता क्रॉस करण्यासाठी सहकार्य करा, असे प्रभू यांनी सांगितले.
Comments are closed.